अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबईत नौदल तैनात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मुंबईसह उत्तर कोकणात 9 जूनपासून तीन दिवस अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक सतर्क झाले असून त्यांनी आज मुंबईतील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. नौदलाची पाच पथके आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या या कालावधीत तैनात ठेवण्यात येणार आहेत. नौदलाच्या पाणबुड्या आणि बचाव पथके सज्ज आहेत. आवश्‍यकतेनुसार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मुंबईसह उत्तर कोकणात 9 जूनपासून तीन दिवस अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक सतर्क झाले असून त्यांनी आज मुंबईतील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. नौदलाची पाच पथके आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या या कालावधीत तैनात ठेवण्यात येणार आहेत. नौदलाच्या पाणबुड्या आणि बचाव पथके सज्ज आहेत. आवश्‍यकतेनुसार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. समुद्रातील मदतकार्यासाठी तटरक्षक दलाला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कुलाबा, वरळी, घाटकोपर, मालाड, ट्रॉम्बे या ठिकाणी नौदलाची पथके तैनात आहेत; तर परळ येथील शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र, पश्‍चिम उपनगरातील अंधेरी क्रीडा संकुल आणि पूर्व उपनगरासाठी मानखुर्द अग्निशमन केंद्रात पूर बचाव साहित्यासह तैनात ठेवण्यात आली आहेत. 

अग्निशमन दलाच्या सहा प्रादेशिक केंद्रांवर पूर बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. सहा समुद्र किनाऱ्यांवर अग्निशमन दल, पोलिस आणि शहर आपत्ती व्यवस्थापन पथके शुक्रवारपासून (ता.8) तैनात ठेवण्यात येणार आहेत. नौदल आणि एनडीआरएफसह अग्निशमन दलाने दरड कोसळण्याची आणि पाणी साचण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. 

मिठी नदीवर लक्ष 
अतिवृष्टीच्या काळात मिठी नदीच्या पातळीत वाढ झाल्यास ही माहिती तत्काळ मुख्य नियंत्रण कक्षास कळविण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्राला भरती असताना पम्पिंग स्टेशनचे फ्लड गेट बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये किती पंप सुरू करण्यात आले याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्याचे आदेश देण्यात आले; तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचे दरवाजे उघडल्यास त्याची माहितीही तत्काळ देण्यास सांगितले आहे. 

अग्निशमन नियंत्रण कक्ष, तटरक्षक दल, रेल्वे नियंत्रण कक्ष, बेस्ट, पोलिस नियंत्रण कक्ष सतर्क. 
आणीबाणीसाठी मदत पथके तैनात. 
महावितरण, रिलायन्स एनर्जी यांनाही सतर्कतेचा इशारा. 
तात्पुरता निवारा म्हणून महापालिकेच्या शाळा तयार. 
ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय ठेवणार. 

पावसाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : 
ऍप : disaster management MCGM 
वेबसाईट : dm.mcgm.gov.in

Web Title: Navy posted in Mumbai after high alert