'नया है वह' च्या टीकेला राऊतांचा पलटवार, फडणवीसांना दिलं उत्तर

पूजा विचारे
Monday, 13 July 2020

'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिले.

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डिझॅस्टर टुरिझम  अशी टिका केली होती. आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तरं दिलं. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिले. नरेंद्र मोदी-अमित शाह हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झालेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केले आहे. मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केले, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी 'या' गोष्टीत बदल करायला हवा, स्वतः पवारांनी केला खुलासा

फडणवीस काय म्हणाले होते

खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये, अशा शब्दात फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते 

कोरोनाकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील मंडळी सरकारवर टीका करत राज्यभर फिरत आहेत. ते सध्या आपत्ती पर्यटनात (डिझॅस्टर टुरिझम) व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. 

अधिक वाचाः मुंबईकरांची शान! आता डबलडेकर बसही लवकरच सेवेत येणार... वाचा बातमी सविस्तर

फडणवीसांची पवार-राऊत यांच्या मुलाखतीवर टीका 

संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणालेत. तसंच कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

naya hai wah sanjay raut answer devendra fadnavis criticism aditya thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naya hai wah sanjay raut answer devendra fadnavis criticism aditya thackeray