एनसीसीचे नौदल युनिट स्थापणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

शहापूर - जिल्ह्यातील तरुणांना सैन्य दल व नौदलाचे शिक्षण मिळावे म्हणून एनसीसीच्या नौदल युनिटची स्थापना करणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली.

शहापूर - जिल्ह्यातील तरुणांना सैन्य दल व नौदलाचे शिक्षण मिळावे म्हणून एनसीसीच्या नौदल युनिटची स्थापना करणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली.

आगरी क्रांती सामाजिक संघटनेच्या आगरी महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला पारंपरिक वेशभूषा, आगरी संस्कृतीचे दर्शन घडवणारी दृश्‍ये, भगवे फेटे अशा जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. स्वागताच्या कमानी लक्ष वेधून घेत होत्या. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून प्राणपणाने लढणाऱ्या हुतात्मा जवानांविषयी मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या कटआऊटद्वारे आदरभाव दाखवल्याबद्दल स्वागताध्यक्ष शिवाजी अधिकारी वर्गाचे, आयोजकांचे संरक्षण राज्यमंत्र्यांनी आभार मानले. आगरी व कुणबी समाजाची संस्कृती व परंपरा एकच असून, यापुढे कुणबी, आगरी, आदिवासी व इतर सर्व समाजबांधवांना एकत्र घेऊन एकच ‘विचारांचा महोत्सव’ व्हावा, अशी सूचना करून खासदार कपिल पाटील यांनी माजी आमदार दौलत दरोडा, कुणबी सेनाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, आमदार किसन कथोरे, दशरथ तिवरे आदी मान्यवरांनी केलेल्या आवाहनाचे समर्थन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी केले. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याने कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रतिसाद न दिल्यामुळे माजी उत्पादन शुल्कमंत्री जगन्नाथ पाटील यांनी निराशा व्यक्त केली. या वेळी भाषाप्रभू जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, माजी आमदार दौलत दरोडा यांनी आपले विचार मांडून महोत्सवास शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर आमदार नरेंद्र पवार, भाजपचे ठाणे-पालघर उपाध्यक्ष संतोष शिंदे, धनावर्धिनी पतसंस्थेचे चेअरमन सतीश गुजराती उपस्थित होते.

शहापूरची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. पाणीटंचाईमुक्तीसाठी सरकारने मदत करावी. तसेच शहरात मिलिटरी स्कूलची स्थापना करावी.
- पांडुरंग बरोरा, आमदार

Web Title: NCC's naval unit set up