राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ भाजपच्या वाटेवर?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

अधिवेशनातच राष्ट्रवादीला दणका देण्याची तयारी; चित्रा वाघ यांच्याकडून इन्कार
मुंबई - विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर अद्याप न सावरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातली अस्वस्थता आता शिगेला पोचली आहे, याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी भाजपने अनेक नेते व संघटन कौशल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना "गळ' टाकले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले प्रसाद लाड यांची त्यांच्या घरी भेट घेतली. या वेळी लाड यांच्या घरासमोर उभी असलेल्या चित्रा वाघ यांच्या गाडीचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये व्हायरल झाले, त्यामुळे चित्रा वाघ भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाघ यांच्या प्रवेशाबाबत चर्चाही केल्याचा दावा सूत्रांनी केला. चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. विविध विषयांवर तात्काळ व अनोखे आंदोलन करण्यात त्यांची ओळख आहे.

उत्तम वक्‍त्या, आक्रमक व अभ्यासू मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मुंबईत महिला राष्ट्रवादीचे उत्तम संघटन केल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आली. राज्य महिला आयोगावर सदस्या असताना वाघ यांची कामगिरी प्रभावी राहिलेली आहे. त्यामुळे अशा महिला पदाधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेश केला, तर मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तो पक्षाला फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. याबाबत भाजपमधून मात्र काहीही ठोस प्रतिक्रिया दिली जात नाही.

भाजपप्रवेशाचा प्रश्‍नच नाही - वाघ
दरम्यान, भाजपप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, की प्रसाद लाड व माझ्यात भावा-बहिणीचे नाते आहे. राजकारणापलीकडे जाऊन कौटुंबिक नाती जोपासली आहेत. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझी संपूर्ण निष्ठा शरद पवार यांच्यासोबतच आहे. पण, मी भेटायला गेलेली असताना माझ्या गाडीचे फोटो काढणे हा प्रकार राजकारणाची पातळी सोडणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, असे स्पष्टीकरण वाघ यांनी दिले.

Web Title: ncp chitra wagh on the way to the bjp party?