esakal | राष्ट्रवादीचे जयंत पाटील संतापले; म्हणाले "अशा धाडींचा वापर..."

बोलून बातमी शोधा

NCP Leader Jayant Patil
राष्ट्रवादीचे जयंत पाटील संतापले; म्हणाले "अशा धाडींचा वापर..."
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रूपयांच्या वसूलीसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि देशमुखांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. याच प्रकरणात अनिल देशमुख यांची अनेकदा चौकशी झाल्यानंतर अखेर शनिवारी त्यांच्याविरोधात सीबीआयने गु्न्हा नोंदवला आणि त्यांच्या निवासस्थानांवर तसेच मालमत्तांवर छापेमारी केली. ही घटना समजल्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींनी पुन्हा एकदा संधी न दवडता अनिल देशमुखांवर टीका केली. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पक्ष अनिल देशमुखांच्या पाठीशी उभा असल्याचं सूचक वक्तव्य केलं.

हेही वाचा: "भ्रष्टाचार करताना कुठलीही लाज..."; भाजपचा घणाघात

"महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही. परंतु अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानांवरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे. त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो", असं स्पष्ट मत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केलं.

हेही वाचा: मुंबईकरांनो, थांबा... लसीकरणासाठी जाण्याआधी ही बातमी वाचाच!

याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काहीशी संमिश्र स्वरूपाची प्रतिक्रिया दिली. "परमबीर सिंह यांच्या तक्रारीवरुन काही लोक कोर्टात गेले. स्वत: कमिशनर कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात कोर्टाला प्राथमिक चौकशीची माहिती दिली का? किंवा कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते का? याबद्दल आम्हाला माहित नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. अनिल देशमुख तपासात सहकार्य करत होते. कुठल्याही तपास यंत्रणेला संशय असेल, तर ते चौकशी करु शकतात. छापेमारी करु शकतात. एफआयआर दाखल करु शकतात. पण ज्या पद्धतीने हे प्रकरण बनवलं गेलं, त्यावरून हे प्रकरण पहिल्या दिवसापासून राजकारणाने प्रेरित असल्याची शंका आहे", असं विधान नवाब मलिक यांनी केलं.