Vidhan Sabha 2019 : भाजपचा जाहिरनामा म्हणजे 5 वर्षांतील अपयशाचा कबुलीनामा : जयंत पाटील

Vidhan Sabha 2019 : भाजपचा जाहिरनामा म्हणजे 5 वर्षांतील अपयशाचा कबुलीनामा : जयंत पाटील

मुंबई : भाजपने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेला त्यांचा जाहिरनामा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपूर्ण अपयशाचा 'कबुलीनामा' आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपाच्या जाहिरनाम्यावर केली आहे.

भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते असेही जयंत पाटील म्हणाले.

या जाहीरनाम्यात सुरुवातीलाच भाजपाने कलम ३७० चा उल्लेख केलेला आहे. एकंदरच काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील निवडणुका जिंकण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न कायम आहे. कलम ३७० ऐवजी महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्यासाठी हा पक्ष काय करणार आहे याचे उत्तर या जाहीरनाम्यातून मिळाले असते तर राज्यातील जनतेने किमान हा जाहीरनामा वाचला तरी असता अशी जोरदार टिकाही जयंत पाटील यांनी केली आहे. 

मी हा जाहीरनामा संपूर्ण वाचला मात्र या जाहीरनाम्यात राज्याच्या सर्वसमावेशी, शाश्वत व संपूर्ण विकासाचे कोणतेही सूत्र अथवा मॉडेल नाही. बहुधा आपण पुन्हा सत्तेत येणार नाही याची खात्री भाजपला झालेली दिसते म्हणून आश्वासनांची पोकळ जंत्रीच या जाहीरनाम्यात भाजपाने दिलेली आहे असे वाभाडेही जयंत पाटील यांनी काढले आहेत. 

या जाहीरनाम्यात दिलेली अनेक आश्वासने केवळ एका वर्षात देखील पूर्ण करणे शक्य आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्ष सत्ता हातात असताना देखील ही आश्वासने का पूर्ण केली नाहीत याचा जाब महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना नक्की विचारेल.

२०१४ मध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करण्याचा उल्लेख होता. २०१९ जाहीरनाम्यात देखील हाच उल्लेख कायम असून या दोन्ही स्मारकांची पहिली वीट सुद्धा रचलेली नाही. यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने ते किती गांभीर्याने पाळतात हे स्पष्ट होते.

या जाहीरनाम्यात भाजपाने ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा उल्लेख केला आहे. मात्र गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना फुले दांपत्याला 'भारतरत्न' का दिला गेला नाही ? याचेही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे.

दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज वाढत चालले असताना भाजपाने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करू असे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात दिले आहे. देशाचा विकासदर पाच टक्क्याहून खाली येण्याची चिन्हे असताना एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे हास्यास्पद स्वप्न दाखवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील उद्योग का बंद पडले ? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यावे. 

नेहमीप्रमाणेच या जाहीरनाम्यात देखील भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनासोबतच गेल्या पाच वर्षात सोळा हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या ? याचेही उत्तर जाहीरनाम्यात लिहायला हवे होते.

याही जाहीरनाम्यात भाजपाने पुढील पाच वर्षात एक कोटी रोजगार निर्माण करण्याचे भ्रामक आश्वासन दिले आहे. मात्र गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो तरुणांनी नोकऱ्या का गमावल्या याचे उत्तर मात्र या जाहीरनाम्यात नाही.

भारतीय जनता पक्षाच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशाच्या या कबुलीनाम्याला महाराष्ट्रातील तरुणाई व नागरिक २१ तारखेला केराची टोपली दाखवतील याची खात्री आम्हाला आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com