प्रकाश सोळंकेंचे राजीनामास्त्र अखेर म्यान

प्रकाश सोळंकेंचे राजीनामास्त्र अखेर म्यान

उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून सन्यास घेत असल्याचे देखील जाहीर केले. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. चौथ्यांदा सोळंके विधानसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे सोळंकेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीमधील बिघाडीच्या चर्चा जोरात सुरु झाल्या. मात्र सोळंके यांनी आता आपला निर्णय मागे घेतला आहे. 

"सर्व कार्यकर्ते आले, घाईत तुम्ही निर्णय घेऊ नका असं सांगितलं. आज जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी बरच वेळ चर्चा केली. त्यातून माझं समाधान झालंय. म्हणून राजीनामा न देण्याचा मी निर्णय घेतला." असं सोळंके म्हणाले  "पवार साहेबांसोबत फोनवरून बोलणं झालं आणि त्यांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेतो आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली." यानंतर या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. 

"मला कोणतेही मंत्रिपद नको, पण मला सन्मानाने काम करण्याची संधी द्यावी, हे मी आधीच सांगितलं होतं ते पक्षाने मान्य केलंय", असंही सोळंके म्हणाले. मात्र "परवा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. माझी चौथी टर्म असल्याने पक्षाने मला न्याय द्यावा अशी इच्छा होती, त्यामुळे थोडी निराशा झाल्याची खदखद सोळंके यांनी व्यक्त केली. "तर राजकीय परिस्थितीचा विचार करून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निष्कर्ष मी काढला होता", असंही सोळंके म्हणाले. मात्र शरद पवार आणि अन्य जेष्ठ नेत्यांशी साधलेल्या संवादानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला.

प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नावर आता पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. "राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठं कुटुंब आहे. या परिवारातील प्रत्येकाचा मान ठेवणं, प्रत्येकाला योग्य संधी मिळणं ही शरद पवारांनी भूमिका आहे", अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. तसेच आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी आता पूर्णपणे दूर झाली असल्याचेही, जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

सोमवारी उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा संपन्न झाला. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेतून सुद्धा नाराजीचा सूर उमटला होता. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील आपली नाराजी माध्यमांसमोर उघड केली. शिवाय संजय राऊत शपथविधी सोहळ्याला अनुपस्थितीत राहिल्यामुळे देखील उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र, संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत, कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.

NCP leader prakash solanke will not resign as member of legislative assembly 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com