कॉलेजमधल्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणाले...

टीम ई-सकाळ
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

राजकारणात चुकीच्या व्यक्ती येतात, हे खरे आहे. पण, त्यांना आवर घालण्यासाठी सर्वसामान्य माणसाने जागरूक राहिले पाहिजे.
- शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

मुंबई : विद्यार्थ्यांना आपले प्रतिनिधी महाविद्यालय आणि विद्यापीठात पाठविण्याचा अधिकार असला पाहिजे, हे माझे मत आहे. महाविद्यालयीन निवडणूक बंद करून लोकशाहीची निवडणुकीची प्रक्रिया थांबविणे योग्य नाही. या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि विद्यार्थ्यांना निवडणुकीची संधी द्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘संवाद साहेबांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शरद पवार यांनी खास शैलीत विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. पुढे ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. राजकारणात चुकीच्या व्यक्ती येतात, हे खरे आहे. पण, त्यांना आवर घालण्यासाठी सर्वसामान्य माणसाने जागरूक राहिले पाहिजे. जी चुकीची प्रवृत्ती आहे, ती बाजूला सारली; तरच राजकारणात शुद्धता येईल. या वेळी पवार यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनावरही प्रकाश टाकला. अभ्यास सोडून खेळ, नाटक आणि जाणकार व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्याच्या गोष्टीत मी पारंगत होतो. महाविद्यालयीन निवडणुका जिंकण्यासाठी तर अधिक प्रयत्नशील असायचो. त्यामुळे चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास एका वर्ष अधिक वेळ लागल्याने पाच वर्षे महाविद्यालयीन जीवनात राहिलो. माझे राजकीय जीवन हे विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

आणखी वाचा - गिरणी कामगारांसाठी खूषखबर, घरांसाठी एक मार्चला लॉटरी

आणखी वाचा - नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का 

देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे, असे भाष्य पवार यांनी आजच्या तरुणाईबद्दल केले. आयुष्यात कितीही मोठ्या पदावर गेलात तरी पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत. तसेच, हार झाली तरी पुन्हा उमेदीने लढले पाहिजे, असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar statement about college university elections