गिरणी कामगारांसाठी खूशखबर!  3835 घरांसाठी एक मार्चला लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील गिरणी कामगारांच्या सक्रिय सहभागामुळेच मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यामुळे गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे मुंबईतच मिळावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यांच्यासाठी 3835 घरांची लॉटरी एक मार्चला काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील गिरणी कामगारांच्या सक्रिय सहभागामुळेच मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यामुळे गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे मुंबईतच मिळावी, यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यांच्यासाठी 3835 घरांची लॉटरी एक मार्चला काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्‍नांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते; तर माजी मंत्री सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. 

इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? शिक्षणमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गिरणी कामगार हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा कणा असून, 18 ते 19 वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्‍न सोडविण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करणार आहे. बॉम्बे डाईंग, श्रीनिवास, बॉम्बे डाईंग सप्रिंग आदी गिरण्यांतील कामगारांच्या 3835 घरांसाठी एक मार्चला लॉटरी काढण्यात येईल. एमएमआरडीएकडून प्राप्त होणाऱ्या 1244 घरांसाठी एक एप्रिलला लॉटरी काढण्यात येईल. गिरणी कामगारांच्या वारसांना जास्तीत जास्त घरे मुंबईत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबईसह उपनगरात वापरात नसलेली 70 एकर जमिनीची पाहणी करून ती ताब्यात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या जमिनीवर 35 हजार घरे बांधणे शक्‍य होईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

थकबाकीदारांनो! दवंडी पिटवूनही लक्षात येत नाही ना? आता कारवाई होणार

मुंबईतील सहा एकर जागा ही संग्रहालयासाठी राखीव आहे. त्यापैकी काही जागा घरांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून जास्तीत जास्त कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होतील. एक लाख 74 हजार गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तत्पूर्वी ज्या जागा सहजतेने उपलब्ध आहेत, त्याबाबत विचार करून तेथे घरे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for mill workers! Lottery on March 1 for 3835 homes