कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले शरद पवार यांचे पत्र दोन पानांचे आहे. त्यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ही दंगल म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट होता, असा आरोप शरद पवार यांनी केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दंगलीची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांच्या या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे पत्रात?
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांचे पत्र दोन पानांचे आहे. त्यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. पत्रात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा दंगलीच्या वेळी देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर केला. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. सरकारने दंगलीच्या सूत्रधारांना पाठिशी घातले आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली. दंगलीचे पुरावे सादर करताना पोलिसांनी मोडून-तोडून सादर केले आहेत. सरकारने पोलिसांच्या मदतीने हा दंगलीचा कट रचल्याचा आरोप, पवारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आणखी वाचा - म्हणून, रायगड जिल्ह्यात वाढलंय मुलींचं प्रमाण

काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजय दिवस साजरा केला जातो. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमाच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी लाखोंच्या संख्येने दलित बांधव कोरेगाव-भीमा येथे पोहोचले होते. त्यावेळे तेथे दंगल उसळली. या दंगलीचे लोण राज्यभर पसरले आणि इतर शहरांमध्येही दंगलीचे प्रकार घडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar wrote letter to cm uddhav thackeray koregaon bhima