म्हणून.. रायगड जिल्ह्यात वाढलंय मुलीचं प्रमाण!

म्हणून.. रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ
म्हणून.. रायगड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ

रायगड : मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच धोका पोहचवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत सर्वत्र घडले; परंतु आता समाजात पसरलेला हा गैरसमजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे समाधानकारक चित्र जिल्ह्यात आहे. प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ' या अभियानामुळे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात आता वाढ होत असल्याचे चित्र आहे. 

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे. या अभियानाला जिल्ह्यामध्ये चांगले यश मिळू लागले आहे. या अभियानामार्फत होत असणाऱ्या जनजागृतीमुळे मुलींचा जन्मदरामध्ये आता वाढ होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने 21 फेब्रुवारी 2015 पासून मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये बेटी बचाव, बेटी पढाओ हे अभियान सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये या अभियानाला सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा व प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या जिल्ह्यामध्ये 2014-15 साली मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे केवळ 909 एवढा होता. याकडे सरकारी यंत्रणेने गांभीर्याने पाहिल्यानंतर या अभियानाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. या अभियानांतर्गत मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. जन्माला येणाऱ्या मुलीचा वाढदिवस साजरा करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन तसेच पथनाट्य विविध कार्यक्रमांतून जनजागृती अशा कार्यक्रमाला जिल्ह्यांमध्ये गती मिळाली आहे. या वर्षीही जानेवारीपासूनच या अभियानाला गती देण्याचे काम सुरू झाले आहे. महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून जिल्ह्यात राबवलेल्या अभियानाला आता बळ मिळू लागले आहे.

ही बातमी वाचली का? अमित ठाकरेंबद्दल आजी कुंदा ठाकरे म्हणतात..

शाळा, अंगणवाडी, माध्यमिक शाळांमध्ये बेटी बचाव, बेटी पढाओची शपथ घेणे, बॅनर, घोषवाक्‍य तसेच सायकल फेरीचे आयोजन, मुलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारी व खासगी शाळांमध्ये कार्यक्रम घेणे, चित्रकला, रंगकला विविध स्पर्धा घेणे, मुलींच्या नावाने वृक्षलागवड करणे, महिला सभांचे आयोजन, चांगले काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव असे विविध कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवले जात आहेत. या जनजागृतीमुळे समाजामध्ये हळूहळू परिवर्तन दिसू लागले आहे. 

मुलगा-मुलगी समान मानणारी नवीन पिढी आता पुढे येऊ लागली आहे. या सर्वांचा सहभाग प्रत्येक मुलीच्या जन्मदर वाढीमध्ये दिसू लागला आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजनाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2014-15 साली 909 असे मुलींचे जन्मदर एक हजारी मुलांमागे होते तोच आता 2018-19 आली एक हजार मुलांमागे 972 एवढे पोहोचले आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत गावोगावी केल्या जाणाऱ्या जनजागृतीला यश येऊ लागले आहे. एक हजार मुलांमागे 950 इतक्‍या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. 

कारवाईचा धसका 
जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांत 15 सोनोग्राफी केंद्रांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी सहा प्रकरणांत डॉक्‍टरांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती, तर काही डॉक्‍टरांचे परवाने रद्द केलेले होते. हा कायद्याचा बडगाही इतर डॉक्‍टरांना वचक करणारा ठरला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रमाणातही घट झाली. 

मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 
2016-17- 910 
2017-18- 929 
2018-19- 972 

1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या एका किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर मातापिता कुणीही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केली असल्यास त्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये ठेव ठेवली जाते. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह ही रक्कम मुलीला मिळते. सहा वर्षांनतर केवळ व्याज मुलीच्या शिक्षण व आरोग्यासाठी वापरता येते. यासाठी नियम व अटी आहेत. 

सरकरी यंत्रणेकडून वेगवेगळ्या अभियानातून केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे समाजप्रबोधनाचे काम होत आहे. त्यातूनच एकत्रितपणे त्याचाही परिणाम दिसत आहे. 
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक 

मुलगा-मुलगी हा भेदभाव करण्याचे दिवस संपले आहेत. अनेक मुली आपल्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवत आहेत, हे आशावादी आहे. 
- प्रतीक मते, पालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com