राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी

मुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु करण्यात आलेत. 
  
भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्यात 'मिशन घरवापसी' राबवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस मिशन घरवापसी राबवणार आहे. महाराष्ट्रात निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात परत घेणार आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

2019 विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. विकासाची काम करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर या नेत्यांना परत राष्ट्रवादीत परत यायचं आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नसून पक्ष एकसंघ आहे. राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात परत यायचं आहे. विशेषत: जे भाजपात गेलेत ते संपर्क करताहेत. भाजपात गेल्यानंतर ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला ते आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. त्यांना पक्षात घेण्यात अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

विद्यमान आमदारांना पक्षात घेणार का हा प्रश्न विचारला असता ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आमदार होऊ शकले नाहीत असे लोक संपर्क करत असून त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच ते आमदार नसल्यानं त्यांना पक्षात परत घेण्यात महाविकास आघाडीतील इतर पक्षांना पण अडचणी नसतील असंही जयंत पाटील म्हणालेत.

दोन दिवसांपूर्वी  मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असं सांगतानाच उलट राष्ट्रवादीमध्येच काही आमदार प्रवेश करण्यासाठी आतूर आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.  नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला होता. त्यानंतरचही बैठक झाली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

  • राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर, उस्मानाबाद – पुन्हा विजयी
  • बबनराव पाचपुते –  श्रीगोंदा, अहमदनगर – पुन्हा विजयी
  • वैभव पिचड –  अकोले, अहमदनगर – पराभूत (आता आमदार नाही)
  • नमिता मुंदडा – केज, बीड (आधी आमदार नव्हत्या, आता विजयी)

शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. मात्र भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्यात.

दरम्यान निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे हे नेते भाजपमध्ये गेले होते. 

  • उदयनराजे भोसले - सातारा
  • शिवेंद्रराजे भोसले - सातारा
  • राणाजगजितसिंह पाटील - उस्मानाबाद
  • धनंजय महाडिक - कोल्हापूर
  • बबनराव पाचपुते - श्रीगोंदा
  • रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस
  • मधुकर पिचड - अकोले
  • गणेश नाईक - नवी मुंबई

NCP Start mission ghar wapsi Sharad pawar give responsibility Ajit pawar jayant patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com