तरुणांसाठी मिनी साहित्य संमेलनाची गरज;डॉ. शशिकांत लोखंडे यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

आजच्या काळात युवकांमध्ये साहित्याची गोडी लागावी आणि वाचन संस्कृती जपली जावी, यासाठी मिनी साहित्य संमेलने जागोजागी व्हावीत. आज युवा पिढीला चांगले साहित्य वाचता यावे यासाठी आता प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि समीक्षक डॉ. शशिकांत लोखंडे यांनी केले.

विरार : आजच्या काळात युवकांमध्ये साहित्याची गोडी लागावी आणि वाचन संस्कृती जपली जावी, यासाठी मिनी साहित्य संमेलने जागोजागी व्हावीत. आज युवा पिढीला चांगले साहित्य वाचता यावे यासाठी आता प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि समीक्षक डॉ. शशिकांत लोखंडे यांनी केले.

यंगस्टार ट्रस्टच्या साहित्य चावडीने आयोजित केलेल्या एक दिवशीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. लोखंडे बोलत होते. यावेळी यंगस्टार ट्रस्टचे अजीव पाटील, कोमसापचे उमाकांत वाघ, ऍड. सुहास पाटील, मुंबई विद्यापीठाचे डॉ. दिनेश कांबळी, प्रभाग समिती सभापती सखाराम महाडिक, महिला व बालकल्याण समिती सभापती माया चौधरी, नगरसेवक हार्दिक राऊत, नगरसेविका मीनल पाटील, चिरायू चौधरी, रिटा सरर्वैया, संजय पिंगुळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुरेखा कुरकुरे यांनी केले.

ही बातमी वाचा : वसईच्या लालमातीत बहरले रंगीबेरंगी सिमला मिरचीचे पीक!

या संमेलनात वेगवेगळ्या विषयावरील परिसंवाद चांगलेच रंगले. उद्‌घाटच्या वेळी शशिकांत लोखंडे यांनी "मराठी साहित्य काल, आज आणि उद्या' या विषयावर आपले विचार मांडले. यंगस्टारचे अजीव पाटील म्हणाले, वसई-विरारमध्ये साहित्याबरोबर कला आणि क्रीडा याची चळवळ सातत्याने सुरू राहावी यासाठी महापालिका आणि यंगस्टर ट्रस्ट असे वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने करत आली आहे. यापुढे ही चळवळ अशीच सुरू राहील याकडे आम्ही लक्ष देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर "शोषितांचे पुनर्वसन' या विषयावरील परिसंवादामध्ये प्रा. विजय उमरजी, धर्माजी खरात, पल्लवी बनसोडे, उमाकांत वाघ, प्रा. अश्‍विनी भोईर यांनी आपले विचार मांडले. 

गझल-कवितांच्या मैफलीला दाद ! 
संध्याकाळच्या सत्रात ज्योती बालिगा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गझलेच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. यात रजनी निकाळजे, भागवत बनसोडे, सुनील ओव्हल, गौतम सकपाळ, कवी मोहन यांनी आपल्या गजल सादर केल्या. शेवटच्या सत्रात कविसंमेलन पार पडले. यात नेत्र धृलकर, नभ पाटील, सुरेखा कुरकुरे, नयन आणि अर्चना जैन, गौरी संखे, विक्रांत केसरकर, किशोरी पाटील, सुप्रिया पाटील, संगीत पाध्ये आणि इतर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी वैजंतीमाला मदने आणि गजलकार ज्योती बालिगा यांचा "चावडी गौरव 2020' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for mini literature meetings for young people;