वसईच्या लाल मातीत बहरले रंगीबेरंगी सिमला मिरचीचे पीक!

प्रसाद जोशी
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

वसईतील काही शेतकऱ्यांनी लाल, हिरवी आणि पिवळ्या सिमला मिरचीची लागवड केली आहे. त्याचे उत्पादन चांगले असून, आर्थिक हातभार लागत असल्याने मिरचीत शेतकऱ्यांसाठी गोडवा निर्माण झाला आहे.

वसई : वसईतील काही शेतकऱ्यांनी लाल, हिरवी आणि पिवळ्या सिमला मिरचीची लागवड केली आहे. त्याचे उत्पादन चांगले असून, आर्थिक हातभार लागत असल्याने मिरचीत शेतकऱ्यांसाठी गोडवा निर्माण झाला आहे.

वसई तालुक्‍यात प्रामुख्याने भातशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते; मात्र हे हंगामी स्वरूपाचे उत्पादन आहे. याशिवाय पश्‍चिम व पूर्व भागात पालक, मेथी या पालेभाज्या तसेच गवार, फ्लॉवर, भेंडी, वांगी, वालपापडी, दुधी, कारली यांसह अन्य भाज्यांची लागवड केली जात आहे; मात्र जास्त प्रमाणात शेतकरी हे पीक घेत असल्याने बाजारभाव तितका मिळत नाही, म्हणून नालासोपारा पश्‍चिमेकडील नवाळे गावात सतीश नाईक यांनी (20 गुंठे), वसई पूर्व तिल्हेर येथील शेतकरी शरद बुधाजी भंडारी (20 गुंठे) व विरार कण्हेर येथील सतीश हरिभाऊ जाधव (10 गुंठे) यांनी मिरचीची लागवड केली आहे. 

यासाठी पॉली हाऊस तयार करण्यात आले आहे. त्यात वाफा तयार करून, आरो बेली व बॉम्बी या जातीच्या मिरचीचे पीक घेतले आहे. वसईचे वातावरण मिरचीसाठी पोषक आहे. जमिनीत लाल माती टाकण्यात आली आहे. वेल तयार झाल्यावर त्याला आधार मिळावा म्हणून त्या पद्धतीने रचना करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा ः बीकेसीच्या धर्तीवर लवकरच केपीसी

10 गुंठे जागेत तीन हजार प्लांट लावण्यात आले आहेत. एकूण 15 हजार किलो मिरचीचे उत्पन्न मिळत असून लाखोंच्या घरात फायदा होत आहे. बुरशीजन्य रोग, खत कोणते वापरावे यासह लागवडीच्या वेळेपासून ते मिरची येईपर्यंत कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी कृषी अधिकारी राहुल शिरसाट, सहायक कृषी अधिकारी पृथ्वीराज पाटील व सहकारी लागवडी क्षेत्राला भेट देऊन वारंवार माहिती आणि मार्गदर्शन करत आहेत. 

शेतकऱ्यांना जमिनीत पीक घेण्यासाठी शासनाकडून 50 टक्के सबसिडी मिळत असल्याने आधार होत आहे. तीन महिन्यांत तीन वेळा उत्पन्न मिळत असून ही लागवड सुरूच ठेवता येत आहे. या मिरचीला 80 ते 120 रुपये किलो इतका भाव मिळत असून वसई, मुंबई, ठाणे यासह अन्य परिसरात चांगली मागणी आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वसईत लाल व पिवळ्या मिरचीच्या लागवडीचा प्रयोग सफल होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याने फायदेशीर ठरत असून उत्पन्न घेण्यासाठी अन्य शेतकरीदेखील पुढे येत आहेत. 

वसई तालुक्‍यात पूर्व आणि पश्‍चिम भागातील शेतकरी हे मिरचीची लागवड करत आहेत. वसई तालुका कृषी विभागाकडून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. रंगीबेरंगी मिरचीला बाजारभाव चांगला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य पिकांपेक्षा अधिक किंमत मिळत आहे. 
- पृथ्वीराज पाटील, सहायक कृषी अधिकारी, वसई तालुका कृषी विभाग. 

वसईत पारंपरिक शेती होत आहे, परंतु अत्याधुनिक आणि बाजारात जास्त किंमत असणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी पुढे आले पाहिजे. जमिनीत पूर्वी भात लागवड होत असे, परंतु बिगरमोसमी पीकदेखील आता घेतले जाते आणि वसईसह अन्य ठिकाणी मिरचीला चांगली मागणी आहे. 
- सतीश नाईक, शेतकरी, नवाळे, नालासोपारा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simila chilli production in vasai