ठाणे स्थानकात सुरक्षा वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणारी स्कॅनिंग मशीन व प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले मेटल डिटेक्‍टर (धातू संशोधक यंत्र) गेले अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि निघून जावे, अशी स्थिती बनली असून स्थानकाची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. 

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणारी स्कॅनिंग मशीन व प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले मेटल डिटेक्‍टर (धातू संशोधक यंत्र) गेले अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि निघून जावे, अशी स्थिती बनली असून स्थानकाची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. 

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात दररोज सुमारे सात लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे ठाणे स्थानक नेहमीच गजबलेले असते. या स्थानकात एकूण 11 फलाट असून येथून मध्य रेल्वे मार्गावर आणि वाशी-पनवेलसाठी ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल धावतात.

स्थानकाच्या पूर्व आणि पश्‍चिम दिशेने विविध 18 ठिकाणांहून प्रवेश करता येतो. त्यामध्ये दोन्ही दिशेला सात अधिकृत प्रवेशद्वारे असली तरी अनेक खुश्‍कीचे मार्ग असल्याने स्थानकात कुणीही यावे, अन कुणीही जावे अशी परिस्थिती आहे. अनेक प्रवेशद्वारे असतानाही केवळ पूर्वेकडील फलाट 10 "अ'वरील तिकीट खिडकीनजीक दोन स्कॅनिंग मशीन आणि दोन्ही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्‍टर उभे केले आहेत. 

या मेटल डिटेक्‍टरचा योग्य वापर होत नसून कुणीही ये-जा करूनही तपासणी केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. या फलाटावरील दोन स्कॅनिंग मशीनपैकी कल्याण दिशेकडील मशीन बंद पडली आहे; तर मुंबई दिशेकडील स्कॅनिंग मशीन कार्यरत असूनही त्याचा वापर केला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी आरपीएफचे (रेल्वे सुरक्षा बल) जवान तैनात असतात.

मात्र, ते केवळ माशा मारत बसलेले असतात, असा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्थानकातील या बंद अवस्थेतील सुरक्षा यंत्रणेसाठी आरपीएफचे मनुष्यबळ नाहक तैनात केलेले दिसून येत असून या यंत्रणेच्या देखभालीसाठी होत असलेला खर्च हा अनाठायी असल्याचे मत रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे. 

कालांतराने मशीनच हटवल्या... 
मुंबईतील 26/11 च्या घटनेनंतर महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांतील घातपाती कारवाया रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्या. त्यात ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि फलाट 10 वर स्कॅनिंग मशीन बसवण्यात आल्या होत्या. यातील फलाट 10 वरील मशीन सुरू असली तरी, आरपीएफकडील मनुष्यबळाअभावी ही यंत्रणादेखील शोभेची ठरली आहे. यातील फलाट दोनवरील दोन स्कॅनिंग मशीन दीड वर्षांपूर्वीच बंद पडली. ही बाब खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्यात त्यावेळी उघड झाल्यानंतर विचारे यांनी आरपीएफ अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कालांतराने या मशीनच येथून हटवण्यात आल्या असून सद्यस्थितीत येथे कसलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. 

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 10 वरील एक स्कॅनिंग मशीन बंद असल्याची बाब सत्य आहे. स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) असून कदाचित अपुऱ्या मनुष्यबळाअभावी देखरेख होत नसावी. तरीही याबाबत आरपीएफकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. 
- राजेंद्र वर्मा, प्रबंधक, 
ठाणे रेल्वेस्थानक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negligence of Security at Thane station