नेरळ- माथेरान घाटात टळली मोठी दुर्घटना, जिप्सी दरीत कोसळता कोसळता वाचली

संतोष पेरणे
Sunday, 24 January 2021

नेरळ-माथेरान घाटात प्रवास करत असताना घाटातील एस टर्न या अवघड वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने जिप्सी गाडी दगडी कठड्यावर चढली.

मुंबईः मुंबई येथील काही पर्यटक कुटुंबासह माथेरान येथे आज सकाळी येण्यास निघाले होते. त्यातील जिप्सीसह असलेले पर्यटक हे नेरळ-माथेरान घाटात प्रवास करत असताना घाटातील एस टर्न या अवघड वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने जिप्सी गाडी दगडी कठड्यावर चढली. दरम्यान सकाळची घटना असलेल्या त्या जिप्सीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.  जिप्सी हेलकावे खात उभी असून हा प्रकार पाहून माथेरान घाटातून प्रवास करणारे यांचा थरकाप होत आहे.

माथेरानला पर्यटनासाठी मुंबई येथून काही वाहने निघाली होती. त्यात प्रामुख्याने कुटुंब एकत्र प्रवास करीत होती. त्यापैकी एमएच 03-6666या क्रमांकाची जिप्सी गाडी नेरळ-माथेरान घाटातून प्रवास करीत असताना वेगाने रस्ता कापत होती. त्यावेळी घाटातील वॉटर पाईप स्टेशन सोडल्यानंतर असलेल्या तीव्र चढावाचा अंदाज जिप्सी चालकाला आला नाही. त्यामुळे ती जिप्सी थेट कठड्यावर आदळली. मात्र त्या ठिकाणी असलेली संरक्षण भिंत ही मजबूत असल्याने जिप्सी गाडीचा अर्धा भाग हा कठड्यावर चढून देखील संरक्षण भिंत तुटली नाही. संरक्षक भिंत तुटली असती तर जिप्सी गाडी किमान 200 फूट खोल दरीत कोसळली असती आणि मोठा अपघात झाला असता. जिप्सी ज्यावेळी माथेरान घाटातील एस टर्नच्या अवघड वळणावर संरक्षक भिंतीला धडकली. त्यावेळी त्या जिप्सी गाडीमध्ये चार प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील चालक वगळता तीन महिला प्रवासी होत्या.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील त्या पर्यटक प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जिप्सी गाडीमधून प्रवास करणारे सर्व जण वाचले आहेत. जिप्सी गाडी दुपारपर्यंत घाटातील रस्त्यावर संरक्षक भिंतीला अर्धवट तरंगत असल्याचे काहीसे भयावह चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र अपघात घडल्यानंतर गाडीमधील प्रवासी हे तेथून आपल्या नातेवाईक यांच्या वाहनातून माथेरान करिता निघून गेल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान,अनेक वर्षानंतर माथेरान घाटातील मोठा अपघात होता होता वाचल्याने स्थानिक समाधान व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा- फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही, त्यानंतर शेराच बदलला; मंत्रालयात घडला धक्कादायक प्रकार

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Neral Matheran Ghat major accident Gypsy crashing valley no casualties


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neral Matheran Ghat major accident Gypsy crashing valley no casualties