माथेरानमध्ये नागरिकांना डिसेंबरपर्यंत गढूळ पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नेरळ - माथेरान शहरातील नागरिक व हॉटेल व्यावसायिकांना पावसाळ्यापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरण राबवीत असलेली नवीन नळपाणी योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम अर्धवट असल्याने आणखी काही दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली.

प्राधिकरणाचे उपअभियंता अजय पालवे यांनी सांगितले की, माथेरानमधील जलशुद्धीकरण केंद्र हे 1923 मधील आहे. तेथे एकच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. पाऊस सुरू असल्यास गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. गाळप यंत्रणा जुनी झाल्यानेही पाणी गढूळ दिसते. सध्या माथेरानमध्ये 2.50 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. हे केंद्र डिसेंबरअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.

'या वर्षी पावसाळ्यात जास्त प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. जीवन प्राधिकरण ठेकेदार कंपनीवर दबाव टाकत नसल्याने डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात हेच पाणी प्यावे लागणार आहेत. आम्ही संयम बाळगला आहे; पण आणखी वाट बघणार नाही,'' असा इशारा माथेरान क्षत्रिय मराठा समाजाने दिला आहे.

गढूळ पाणीपुरवठ्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार आम्ही अलिबाग येथील रासायनिक सूक्ष्मजीव केंद्रात चाचणी घेतली आहे. जीवन प्राधिकरणाने सातत्याने पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
- किरण शानबाग, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

Web Title: neral mumbai news uncleaned water