डाव्यांची मोट बांधताना कॉंग्रेसही सक्षम करा - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नेरळ - देशात भाजपच्या रूपाने भांडवलदारांचे राज्य आले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि कामगार त्यामुळे संकटात आहेत. यामधून त्यांची पर्यायाने देशाची सुटका करण्यासाठी डाव्यांची मोट बांधतानाच कॉंग्रेसला सक्षम करण्याची जबाबदारी आपलीच आहे, अशी स्पष्ट भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मांडली. पक्षाचा 70 वा वर्धापन दिन बुधवारी नेरळमध्ये साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते.

'देश आज भांडवलदारांच्या हातात गेला आहे. सत्तेवर बसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किती लोक स्वातंत्र्य चळवळीत होते, याचा अभ्यास केला, तर एकही नाही, असे उत्तर मिळते. त्यामुळे देशासाठी त्याग करणारे बाजूला आणि सत्ता भलत्यांकडेच अशी आजची स्थिती आहे. स्वातंत्र्यासाठी खरे योगदान देणाऱ्यांपैकी कॉंग्रेस पक्ष आज बाजूला पडला आहे. त्यांना वाचविणे ही आमची जबाबदारी आहे. देशाला भांडवलदारांच्या जोखडातून सोडविण्यासाठी कॉंग्रेसबरोबर आमची डावी चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्यासाठी डाव्या विचारांच्या पक्षांना एकत्र करण्याची गरज निर्माण झाली आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले.

मिरवणूक थाटात
शेकापच्या 70 व्या वर्धापन दिनाची सुरवात नेरळ गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने झाली. मिरवणुकीत 100 पेक्षा अधिक घोडे आणि बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. प्रमुख नेते हे रथावर स्वार झाले होते. मुख्य सभामंडपात उभारण्यात आलेली क्रांतिज्योत जयंत पाटील यांनी प्रज्वलित केली. ध्वजवंदन पुणे जिल्हा चिटणीस राहुल पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: neral news jayant patil talking in shekap party anniversary