पेप्सी विक्रीच्या आडून दहशतवादाचे जाळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

'इसिस'मध्ये तरुणांना ओढण्याची नाझिमवर होती जबाबदारी

'इसिस'मध्ये तरुणांना ओढण्याची नाझिमवर होती जबाबदारी
ठाणे - उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंब्य्रातून अटक केलेला उमर ऊर्फ नाझिम शमशाद अहमद हा दहशतवादी कारवायांतील मोठा मासा ठरण्याची शक्‍यता आहे. सायकलवरून पेप्सी विक्री करून त्याने मुंबई परिसरात नेटवर्क तयार करण्याचे प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तरुणांना भडकावून त्यांना "इसिस'मध्ये सामील करणे आणि त्यासाठी पैसे गोळा करण्याची जबाबदारी नाझिमवर होती. अशा प्रकारे त्याने 12 तरुणांची माथी भडकवली आहेत. या कारवाईनंतर मुंब्य्राचे नाव पुन्हा दहशतवादी कारवायांशी जोडले गेले आहे.

ठाण्यातील मुंब्रा हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या भागात स्वस्तात आणि चौकशीविना राहण्याची सोय होते. त्याचा फायदा दहशतवादी कारवायांत करून घेतला जात असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. देवरीपाडा येथील समाधान अपार्टमेंटमधील अकरम मंझील इमारतीत नाझिम तिसऱ्या मजल्यावर वन रूम किचन फ्लॅटमध्ये राहत होता. तो उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील आहे. दोन वर्षांपासून तो येथे होता. घरमालक गावी गेल्यानंतर त्याने आणखी दोघांना येथे राहण्यासाठी आणले. शेजाऱ्यांना ते नातेवाईक असल्याचे सांगितले होते. गतवर्षी मुंबई एटीएसने या भागातून तबरेझ आलम, तर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मुद्दबीर शेख यांना अटक केली होती. या आरोपींचे इंटरनेट आणि सोशल मीडिया हे संपर्काचे प्रमुख साधन असल्याचे दिसून आले आहे. नाझिम हाही ऑनलाइन चॅट ऍप्लिकेशनच्या मदतीने परदेशांत संपर्क साधत होता. त्यातून कट रचत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Web Title: The network of terrorism by selling Pepsi