ठाण्यात कोरोना रुग्णांसाठीचे शेकडो नवे कोरे बेड मैदानात पडून

ठाण्यात कोरोना रुग्णांसाठीचे शेकडो नवे कोरे बेड मैदानात पडून
Updated on

मुंबईः  कोरोना हॉस्पिटल आणि क्वारंटाईन सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले शेकडो नवे कोरे बेड शिवसमर्थ विद्यालयाच्या मैदानात पडून असल्याचं आज उघडकीस आले. तर वीर सावरकरनगरमधील शाळेतही रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध वस्तू वापराविना आढळल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी हा प्रकार उघड करून कोरोना आपत्तीत केलेली विविध साहित्याची जम्बो खरेदी कोणाचे पोट भरण्यासाठी केली होती, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेने कोरोना सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी केले. महासभेपुढे सादर करण्यात आलेल्या गोषवाऱ्यानुसार महापालिकेने आतापर्यंत 27 हजार उशी कव्हर, 21 हजार बेडशीट, 21 हजार टॉवेल, 18 हजार नॅपकीन, 14 हजार बादल्या, 3 हजार कचऱ्याची सुपडी आदी साहित्यांबरोबर बेड आणि मॅट्रेस खरेदी केल्या आहेत. मात्र, या साहित्याचा उपयोग न करता ते पडून असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर आज प्रकाश पडला.

गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ विद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे क्वारंटाईन सेंटर उभारले गेले नाही. मात्र त्याठिकाणी पाठविण्यात आलेले नवे कोरे बेड मैदानात पडून आहेत. ऊन-पावसामुळे काही बेडला गंजही लागला आहे. महापालिकेच्या वीर सावरकर नगर येथील शाळा क्र. 120 मध्येही कोविड रुग्णांसाठीचे साहित्य वापराविना पडून आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आज हा प्रकार उघड केला.

कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी अनिर्बंध खरेदी केली. आवश्यकतेनुसार वस्तू खरेदी करण्याची गरज होती. मात्र, केवळ लूट करण्यासाठी साहित्याचे आकडे फुगविण्यात आले, असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला. संबंधित कंत्राटदारांना बेडच्या आवश्यकतेनुसार कार्यादेश देण्याची गरज होती. विविध साहित्य साठविण्यासाठी महापालिकेकडे गोदामही नव्हते. मात्र, एकाच वेळी साहित्य खरेदीचा अट्टाहास का करण्यात आला, असा सवाल नारायण पवार यांनी केला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

 
अवघ्या दोन मीटर सफेद कपड्याची बेडशीट

महापालिकेच्या वीर सावरकर नगर येथील शाळा क्र. १२० मधील एका खोलीत कोरोना रुग्णांसाठी ठेवलेल्या बेडवर टॉवेल आणि बेडशीट आढळली. भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेडशीट पाहिल्यावर तो अवघ्या दोन मीटरचा सफेद कपडा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेने आपत्तीच्या काळात खरेदी केलेल्या साहित्याच्या गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण झाला, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.
----------------------

(संपादन- पूजा विचारे)

New bed Corona patients placed in Shivsamartha Vidyalaya grounds Thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com