
माणगाव (वार्ताहर) : माणगाव शहरात अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाला स्वतंत्र इमारतीची गरज असून सरकारकडून त्यासाठी आर्थिक मदत हवी आहे. यासाठी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांनी खासदार सुनील तटकरे यांची शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. या वेळी सुनील तटकरे यांनी लगेच घोषणा करत मदत जाहीर केली. येत्या १८ फेब्रुवारीला नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येईल, असे जाहीरही केले.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एकच विधी महाविद्यालय आहे. या वर्षापासून माणगाव येथे विद्यालय सुरू झाले आहे. या महाविद्यालयात सुमारे ५० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला असून, महाविद्यालयाचा पहिला वर्ग सुरू झाला आहे. सरकारच्या निकषाप्रमाणे विधी महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी अंदाजे ४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या महाविद्यालयात रोहा, पाली, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, मंडणगड, दापोली, खेड, आणि माणगाव या तालुक्यांतील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. माणगाव येथे विधी महाविद्यालय झाल्याने या तालुक्यातील विद्यार्थ्यांना जाणे-येणे सोईचे असल्याने प्रवेश नोंदवला आहे, अशी सविस्तर माहिती चर्चा करताना राजीव साबळे यांनी तटकरे यांना दिली. या वेळी त्यांनी, ही इमारत बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध विकास योजनेतून आर्थिक निधी मिळावा, यासाठी आग्रह धरला होता.
हे विधी महाविद्यालय दिवंगत माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या नावाने सुरू करण्यात आले आहे. त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण होणार आहे. अशोकदादा साबळे यांनी ज्या मागण्या माझ्याकडे मागितल्या, त्या सर्व आर्थिक मदत करून पूर्ण केल्या आहेत. नाट्यगृह, नानानानी पार्क यादेखील मागण्या पूर्णत्वाला येतील. या संस्थेला यापूर्वीही आर्थिक मदत करून माणगाव शहराच्या विकासात आणि वैभवात भर घातली आहे. सध्या विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी द. ग. तटकरे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ही अडचण लक्षात घेता नवीन इमारत बांधणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे येत्या १८ फेब्रुवारीला नवीन इमारतीचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा करत तटकरे यांनी मदत जाहीर केली.
या वेळी संस्थेचे सेक्रेटरी कृष्णा गांधी, विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. विनोद घायाळ, शाळेचे अध्यक्ष राजन मेथा, डी. जी. तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खामकर, ॲड. महेंद्र मानकर, ॲड. पंकज खामगावकर, संचालक नरेंद्र गायकवाड, ज्योती बुटाला, माजिद हाजिते, मुख्याध्यापक धनाजी जाधव, पूनम गायकवाड, उणेगाव सरपंच राजू शिर्के, सुधाकर शिपुरकर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती मोरे, नितीन बामुगडे संस्थेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यातील उपस्थिती
या विधी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार अनिकेत तटकरे, रायगड युवा सेना प्रमुख विकास गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, माणगाव नगराध्यक्ष योगीता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी सभापती प्रभाकर उभारे, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, ॲड. महेंद्र मानकर, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापती, सरपंच यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
हे महाविद्यालय राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात आणि माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघात येत असल्याने याचा रास्त अभिमान आहे. म्हणून या महाविद्यालयासाठी आर्थिक निधी कमी पडू देणार नाही. तसेच इतर माध्यमातूनही मदत करून लवकरात लवकर या महाविद्यालयाची इमारत होण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करेन.
- सुनील तटकरे, खासदार, लोकसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.