ठाण्यातील नवे उड्डाणपूल खड्ड्यांतच 

दीपक शेलार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ठाणे महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल, नौपाडा आणि मखमली तलाव येथील नवीन उड्डाणपुलाची पुरती दुर्दशा झाली आहे.

ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि ठाणे महापालिकेने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपूल, नौपाडा आणि मखमली तलाव येथील नवीन उड्डाणपुलाची पुरती दुर्दशा झाली आहे. राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुलांचे लोकार्पण करण्यात आले होते; मात्र यंदा लांबलेल्या पावसाने या पुलांची पोलखोल केली असून पुलावर पडलेले खड्डे आजतागायत "जैसे थे' असल्याने वाहने हाकताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. दरम्यान, कॅसल मिलनजीक एका पुलावर डागडुजीसाठी केलेल्या निकृष्ट डांबरीकरणामुळे वाहनांना "गचके' खात मार्गक्रमण करावे लागत असल्याच्या तक्रारी चालक करीत आहेत. 

ठाण्यातील अंतर्गत मार्गावरील कोंडी सुटावी, यासाठी एमएमआरडीए आणि महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून 221 कोटींचे संत नामदेव चौक नौपाडा, कॅसल मिल येथे मीनाताई ठाकरे चौक आणि मखमली येथील अल्मेडा चौक या तीन उड्डाणपुलांची निर्मिती केली. गत वर्षभराच्या कालावधीत या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. नऊ महिन्यांपूर्वी (3 मार्च 2019) नौपाडा आणि मीनाताई ठाकरे उड्डाणपुलाचे लोकार्पण युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते; मात्र या उड्डाणपुलांची कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत, याची प्रचिती यंदाच्या पहिल्याच पावसात ठाणेकरांना आली. 

मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलाच्या सुरुवातीपासून खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. या उड्डाणपुलावरील वाय जंक्‍शनपासून पुलाच्या चढणीपर्यंत खड्ड्यांचे आगर बनले आहे. या उड्डाणपुलावर उद्‌घाटनानंतर पहिल्याच दिवशी अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाला होता; तर आता पाऊस संपूनही येथील खड्ड्यांचे विघ्न संपले नसल्याने अपघातांची भीती व्यक्त होत आहे. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे गोकुळनगर मार्ग आणि माजिवडा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. 

नौपाडा येथे उतरणाऱ्या संत नामदेव चौक उड्डाणपूल आणि मखमली येथील उड्डाणपुलाचीही अशीच अवस्था आहे. या उड्डाणपुलावरील रस्त्याचा वरचा थर पावसात वाहून गेल्याने मोठमोठी विवरे तयार झाली असून पुलावर ठिकठिकाणी रस्ता असमान झालेला आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या उड्डाणपुलामुळे अपघात घडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात पालिकेचे मुख्य अभियंता रवींद्र खडताळे आणि कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर यांना वारंवार संपर्क करूनही संपर्क होऊ शकला नाही. 

जबाबदारी कंत्राटदाराचीच : पालिका 
यंदाच्या पावसात उड्डाणपुलावर खड्डे पडले असून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यानंतर आगामी पाच वर्षांत उड्डाणपुलाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दुरुस्तीबाबत अवलोकन करण्यात आलेले आहे. यात महापालिकेवर कोणताही भार पडणार नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New flyover in Thane within the pits