सिलिंडर स्फोटातील जखमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १६ मधील पंचरत्न अपार्टमेंट सोसायटीतील घरात २०१४ मध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. ही इमारत पालिकेने अतिधोकादायक जाहीर केल्याने तेथील रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. सोसायटीमधील इमारतींच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु पालिका आणि सिडकोच्या जाचक अटींमुळे ती रखडल्यामुळे ३४ कुटुंबे भाड्याच्या घरात; तर ३४ कुटुंबे धोकादायक इमारतीच्या उर्वरित भागात राहत आहेत.

३ फेब्रुवारी २०१४ ला पंचरत्न सोसायटीमधील ए टाईपच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला; तर अन्य १२ जण जखमी झाले होते. नवी मुंबई शहरात पालिका आणि सिडकोचे संक्रमण शिबिर नसल्यामुळे डोक्‍यावरचे घराचे छप्पर उडून गेलेल्या रहिवाशांनी काही दिवस कुकशेत गावातील पालिका शाळेचा निवारा घेतला होता. त्यावेळी या नागरिकांसाठी मदतीचे हातही पुढे आले होते. या स्फोटात १० घरांचे मोठे नुकसान झाले. तेथील कुटुंबांना भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. ही १० कुटुंबे तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहेत. या सोसायटीमध्ये एकूण ६८ घरे आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये पालिकेने या इमारतीमधील ३४ घरांमधील नागरिकांना राहण्यास मनाई करून इमारत अतिधोकादायक घोषित करून नोटिसा बजावल्या. त्यानंतरही नागरिकांनी घरे रिकामी न केल्याने पुन्हा ऑक्‍टोबरमध्ये नोटिसा बजावल्या. सोसायटीमधील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी सहा महिन्यांची मुदत मागितली होती. परंतु पालिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सोसायटीमधील नागरिक न्यायालयात गेले. परंतु न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पालिकेने डिसेंबरमध्ये पाणी आणि विजेचे कनेक्‍शन बंद करून घरे रिकामी करून घेतली. 

सोसायटीने या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिडकोचा ना हरकत दाखला आणि पालिकेच्या १०० टक्के पार्किंग अटीमुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे पालिकेने अट शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

इमारत अतिधोकादायक घोषित करून पालिकेने घराबाहेर काढले आणि भाड्याच्या घरात ताटकळत ठेवले. इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र आणि पालिकेचे बांधकाम प्रमाणपत्र लवकर द्यावे. या इमारतीमध्ये सामान्य नागरिक राहतात. त्यांना घरभाडे परवडत नाही. 
- तानाजी घोलप, खजिनदार 

नवी मुंबईत सिडकोने घरे बांधली; परंतु निवारा केंद्राची व्यवस्था केली नाही. पालिका १०० टक्के घरांसाठी पार्किंगची व्यवस्था करायला सांगते. परंतु या सोसायटीचा भूखंड लहान असल्याने ८० टक्के पार्किंगची व्यवस्था होईल. यामुळे काम रखडले आहे. पालिकेने ही अट शिथिल करावी.
- गणेश भगत, सोसायटी सदस्य.

Web Title: new mumbai belapur news cylinder blast