महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी "जोरात'! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या (सानुग्रह अनुदान) रकमेत महापालिकेच्या महासभेतही वाढ करण्यात आली. आता कायम कर्मचाऱ्यांना 20 हजार व कंत्राटी कामगारांना 15 हजार रुपये बोनस देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. 

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या (सानुग्रह अनुदान) रकमेत महापालिकेच्या महासभेतही वाढ करण्यात आली. आता कायम कर्मचाऱ्यांना 20 हजार व कंत्राटी कामगारांना 15 हजार रुपये बोनस देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. 

स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने कायम कर्मचाऱ्यांना 17 हजार व कंत्राटी कामगारांना नऊ हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता; मात्र त्याला काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्या वेळी शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तू तू-मै मै रंगली. अखेर सभापती शुभांगी पाटील यांनी प्रस्तावात वाढ करून नगरसेवकांमधील वाद शमविला. स्थायी समितीने कायम कर्मचाऱ्यांना 19 हजार व कंत्राटी कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये बोनस जाहीर केला होता. 

महापौर सुधाकर सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेमध्ये हा प्रस्ताव आज मांडण्यात आला. सभागृहनेते जयवंत सुतार यांनी बोनसच्या प्रस्तावात वाढ करण्याची सूचना केली. स्थायी समितीने मंजूर केलेल्या कायम कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या 19 हजारांच्या रकमेत एक हजाराची वाढ करून तो 20 हजार रुपये करण्यात आला, तर कंत्राटी कामगारांच्या 12 हजारांमध्ये तीन हजारांची वाढ करून तो थेट 15 हजार रुपये करण्यात आला. महासभेत हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, महापालिकेकडून यंदाच्या वर्षी भरघोस सानुग्रह अनुदान मिळाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. 

तिजोरीवर ताण 
महापालिकेतील नगरसेवकांनी कामगारांना भरघोस बोनस देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ताण येणार आहे. स्थायी समितीसमोर प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पाच कोटी 75 लाख रुपयांचा ताण पडणार होता; मात्र आता महासभेनेही वाढीव बोनसला मंजुरी दिल्यामुळे तिजोरीवर सात कोटी 75 लाख रुपयांचा ताण पडणार आहे. 

"एनएमएमटी'मध्येही आशा पल्लवित 
महापालिकेच्या कामगारांना मिळणाऱ्या बोनसएवढीच रक्कम "एनएमएमटी'च्या (नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा) कर्मचाऱ्यांना दिली जाते; मात्र या वेळी अनेक कामगार संघटनांनी जादा बोनसची मागणी प्रशासनाकडे केली होती. महापालिकेने घसघशीत बोनस जाहीर केल्यामुळे वाढीव बोनससाठी "एनएमएमटी'तील कर्मचाऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: new mumbai municipal employee