नवी मुंबई पालिकेजवळच अस्वच्छता

सुजित गायकवाड 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुख्यालयाजवळ स्वच्छतागृह नसल्याबाबत प्रशासनाला प्रश्‍न विचारला आहे, परंतु मुख्यालयाच्या आवारात स्वच्छतालय प्रस्तावित असल्याने ते लवकर बांधण्यात येईल, असे आश्‍वासन मिळाले आहे.
- सुनीता मांडवे, नगरसेविका, शिवसेना

नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक आणि विविध पैलूंमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाम बीच मार्गावर किल्ले गावठाणाशेजारी बांधलेल्या महापालिका मुख्यालयाच्या देखण्या वास्तूमुळे हा परिसर शनिवार, रविवारसह सणासुदीत नागरिकांनी गजबजलेला असतो.

मुख्यालयाजवळच्या मोकळ्या वातावरणात अबालवृद्ध आणि सेल्फीप्रेमी येत असतात, परंतु मुख्यालयाच्या आवारात शंभर मीटरच्या परिसरात एकही स्वच्छतागृह नसल्याने त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागते.

पाम बीच रोडवरील आलिशान व भव्य पालिका मुख्यालयाच्या इमारतीमुळे दर शनिवार, रविवार, सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक फिरायला येतात. महापालिकेचा वर्धापन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन व नवीन वर्षानिमित्त महापालिका मुख्यालयाला रंगीत विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे मुख्यालयाजवळचा परिसर उजळून निघतो. दिवसा पांढऱ्याशुभ्र रंगाने ही इमारत उजळलेली असते. त्यामुळे दिवसा आणि रात्री मुख्यालयाजवळ येणाऱ्यांची संख्या जास्त असते. मुख्यालयाच्या आवारातील वातावरण मोकळे असल्यामुळे मुख्यालयाच्या समोरील रस्त्यावर फिरण्यासाठी, लॉनवर बसण्यासाठी, मुख्यालयासमोर फोटो काढण्यासाठी नवी मुंबई व शेजारच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. मुख्यालयात स्वच्छतागृहे आहेत, परंतु कार्यालयीन वेळेनंतर सुरक्षा रक्षक आत प्रवेश करण्यास मनाई करतात. मुख्यालयाच्या आवारात कुठेच स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने नाइलाजाने नागरिकांना मुख्यालयाच्या शेजारील अडगळीच्या जागेत उघड्यावर लघुशंका करावी लागते. मुख्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे स्वच्छतागृह आहे, परंतु लघुशंकेसाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्यास नागरिक तयार नसल्याने ते मुख्यालय परिसरात उघड्यावरच जातात. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासाठी सुमारे २०० कोटी खर्च आला. संसद भवन इमारतीप्रमाणे गोलाकार व राष्ट्रपती भवनाप्रमाणे इमारतीवर घुमट अशी इमारतीची रचना आहे.

सातव्या मजल्यावर स्वच्छतागृहाचा आभाव
महापालिका मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावर प्रेक्षक व पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी आहेत. महासभेचे कामकाज पाहण्यासाठी नागरिक गॅलरीत येत असतात, परंतु मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावर स्वच्छतागृह नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.

Web Title: new mumbai news Disability in Navi Mumbai