फुटबॉलच्या मैदानावर मदुराई रेतीचे अच्छादन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

फुटबॉलसाठी ज्या पद्धतीचे मैदान लागते, त्याच पद्धतीने हे मैदान तयार केले जात आहे. त्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी मैदानावर विशेष प्रकारचे गवत लावले आहे. मैदानासाठी खास वाळूही मागवली आहे. 
- रेव्वाप्पा गुरव, क्रीडा अधिकारी 

नवी मुंबई - फिफा वर्ल्डकपच्या तयारीची कामे नवी मुंबईत सध्या वेगाने सुरू आहेत. या स्पर्धेतील फुटबॉलचे मुख्य सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार असले, तरी सरावासाठी तयार केल्या जाणाऱ्या नेरूळमधील मैदानाच्या तयारीतही पालिकेच्या उद्यान आणि क्रीडा विभागाचे अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत. यात या मैदानासाठी लागणारी मदुराई सॅंड खास बंगळूरु येथून मागवली आहे. 

कोणत्याही खेळासाठी मैदान फार महत्त्वाचे असते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी या मैदानांवर विशेष लक्ष दिले आहे. सध्या नेरूळमध्ये सरावासाठीच्या मैदानाचे काम वेगान सुरू आहे. यासाठी सराव सामन्यांच्या मैदानांची डागडुजी तर केली आहेच; याशिवाय तेथील इतर सुविधांसाठी खास मेहनत घेतली जात आहे. क्रिकेटच्या मैदानासाठी वेगळ्या पद्धतीचे गवत आणि वेगळी वाळू लागते. तसेच फुटबॉल सामन्यासाठीही वेगळ्या पद्धतीचे मैदान तयार करावे लागते. सध्या तयार होणाऱ्या या मैदानावर रेफिना नावाचे गवत तयार केले आहे. हे गवत अधिक वाढू नये, यासाठी वेळेवर कटिंग केली जाते. यात काही रानटी गवत उगवणार नाही, याची दक्षता घेतली जाते. तसे गवत दिसले, तर ते लगेट उपटून काढले जात आहे. या गवताबरोबर या सराव मैदानावर खास वाळू टाकली जात आहे. बंगळूरुमधून ही मदुराई सॅंड मागवली आहे. समुद्रातील पांढरी वाळू टाकून फुटबॉलसाठी मैदान तयार केले जाणार आहे. उन्हाने हिरवळ सुकू नये म्हणून तुषार सिंचन पद्धतीने पाणी शिंपडले जात आहे. फिफाच्या नियमानुसार मैदानात प्रेक्षक गॅलरीही उभारली जात आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना या सरावाच्या सामन्यांचा आनंद घेता येईल. 

Web Title: new mumbai news football Madurai Sand