महापालिकेत घोडेबाजार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

यापूर्वी या बातमीत अनावधानाने बृहन्मुंबई महापालिकेचे छायाचित्र वापरले गेले होते. ही चूक दुरुस्त केली आहे.

नवी मुंबई - महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम शुक्रवारी (ता. ३०) निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या मोक्‍याच्या जागेवर वर्णी लागावी यासाठी महापालिकेत घोडेबाजार सुरू झाला आहे. यात इच्छुकांनी लाखोंची बोली सुरू केली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार आधीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू आहे. परंतु, या जागेवर मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी यासाठी महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून वजनदार नेत्यांमार्फत लॉबिंग सुरू असल्याचे समजते. मात्र, या नियुक्तीचा निर्णय आयुक्त एन. रामास्वामी हेच घेणार असल्याने तेथे कोणाची वर्णी लागणार हे गुलदस्त्यात आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाच्या अधिकारात महापालिकेची सर्व रुग्णालये आणि त्यांना लागणारे साहित्य खरेदी येते. रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या भरतीसह बदल्यांचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना असल्यामुळे या पदाला जास्त महत्त्व आहे. या पदावर काही महिने काम केलेले डॉ. रमेश निकम निवृत्त होणार असल्याने तेथे आपली नियुक्ती व्हावी यासाठी इच्छुकांकडून मर्जीतील अधिकाऱ्यांमार्फत मनधरणी सुरू आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बोली लावली गेली असून महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव यात समोर येत आहे. नवी मुंबईतील वजनदार नेत्याच्या मध्यस्थीने आयुक्त एन. रामास्वामी यांच्यावर दबाव टाकून सध्या महापालिकेच्या सेवेत असलेले व विभागीय चौकशीला सामोरे जाणाऱ्या एका डॉक्‍टरच्या नावाशी शिफारस केल्याचे समोर आले आहे. सध्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीतून आपली सुटका कशी होईल यासाठी काही त्रुटी ठेवता येतील का यासाठी या अधिकाऱ्याचा खटाटोप सुरू आहे. त्याच्या प्रयत्नाला संबंधित चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनही प्रतिसाद मिळत असल्यामुळे कधी काळी फक्त केबिनबाहेरून जाणारा अधिकारी चक्क दोन तास चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये बसत आहे. इतकेच काय तर एकमेकांचे डबे खाण्यापर्यंत या अधिकाऱ्यांची मैत्री घट्ट झाली आहे.

४० लाखांचा व्यवहार
इच्छुक अधिकाऱ्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर वर्णी लागावी यासाठी तब्बल ४० लाखांचा व्यवहार केल्याची खात्रीलायक माहिती महापालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती करण्याचे अधिकार फक्त आयुक्त एन. रामास्वामी यांनाच असल्याने ते प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना बोलावतात की सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

Web Title: new mumbai news municipal corporation