यशवंतराव चव्हाण मैदानासाठी आता शुल्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने फिफाच्या सराव सामन्यांसाठी नेरूळ सेक्‍टर १९ येथे तयार केलेल्या मैदानासाठी नवी मुंबईतील खेळाडू, संस्था, शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना, स्पोर्टस्‌ क्‍लब आदींसाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याबाबतचे धोरणही आखले आहे. त्यामुळे या मैदानाचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत.

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने फिफाच्या सराव सामन्यांसाठी नेरूळ सेक्‍टर १९ येथे तयार केलेल्या मैदानासाठी नवी मुंबईतील खेळाडू, संस्था, शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना, स्पोर्टस्‌ क्‍लब आदींसाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याबाबतचे धोरणही आखले आहे. त्यामुळे या मैदानाचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत.

नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गेल्या वर्षी झालेल्या १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांसाठी नवी मुंबई महापालिकेने नेरूळमधील यशवंतराव चव्हाण मैदान तयार केले होते. हे सामने संपल्यानंतरही ते खेळाडूंसाठी खुले केलेले नाही. याबाबत ‘सकाळ’ने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने हे मैदान खुले करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु या फुटबॉल मैदानाच्या वापरासाठी शहरातील खेळाडू, संस्था, शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना, स्पोर्टस्‌ क्‍लब आदींना शुल्क भरावे लागणार आहे. त्याचे दर आणि नियमावलींचा प्रस्ताव तयार करून पालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. १९) सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस यांनी आक्षेप घेत क्रीडाबाबतचा हा प्रस्ताव असल्याने महासभेत चर्चा होण्याआधी तो क्रीडा समितीत चर्चेसाठी ठेवण्याची विनंती महापौर जयवंत सुतार यांना केली. त्यानुसार महापौरांनी हा प्रस्ताव क्रीडा समितीकडे पाठवला आहे. चव्हाण मैदानाच्या एका भागात तयार केलेल्या या फुटबॉल मैदानाचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक खेळाडू खेळांसाठी करत होते. फुटबॉलच्या मैदानामुळे त्याचा काही भाग व्यापला गेला असून, त्यामुळे मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक खेळाडूंनी केली होती; परंतु पालिका प्रशासनाने फुटबॉल मैदान वापरासाठी आकारलेले दर आणि धोरण यामुळे खेळाडूंची निराशा झाली आहे. त्यामुळे क्रीडा समितीमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे यात सुधारणा होण्याची शक्‍यता आहे.

चित्रीकरणासाठी मैदान मिळणार 
फुटबॉलसाठी बनवण्यात आलेले मैदान पालिका प्रशासनाने भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार, रविवार वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत. हे मैदान मालिका, चित्रपट आणि ॲडफिल्मच्या चित्रीकरणासाठीही भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी आठ हजारांपासून १२ हजारांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे. चित्रीकरणासाठी २५ हजार अनामत भरावी लागणार आहे.

Web Title: new mumbai news Yashwantrao Chavan ground charges