नवी मुंबईसाठी पासपोर्ट कार्यालय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

बेलापूर - नवी मुंबईसाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले जाईल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 17 जूनला माजी खासदार संजीव नाईक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. नाईक यांनी नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. 

बेलापूर - नवी मुंबईसाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले जाईल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 17 जूनला माजी खासदार संजीव नाईक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. नाईक यांनी नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. 

झपाट्याने विस्तारित होणाऱ्या 21 व्या शतकातील नवी मुंबईची लोकसंख्या 15 लाखांच्या वर गेली आहे. नवी मुंबई शेजारच्या पनवेल, खारघर आणि उरणची लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे. हा सर्व भाग मिळून 25 लाखांच्या लोकसंख्येचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या सोईसाठी नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे 23 मार्चला केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबईसाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे कळवले आहे. 

नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्टसाठी ठाण्यातील कार्यालयात जावे लागते. पनवेल, खारघर, उरण आदी परिसरातील नागरिकांना त्यासाठी 15 ते 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसे खर्च होतात. नवी मुंबईत औद्योगिक वसाहत, आय. टी. पार्क, हॉटेल, क्रीडा संकुल, विद्यापीठ आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे येथील अनेक नागरिकांना पासपोर्टची गरज पडते. त्यांच्या सोईसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी नाईक यांनी केली होती. 

स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयामुळे नवी मुंबईसह पनवेल, खारघर, उरण परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. त्यांना पासपोर्टसाठी लांबचा प्रवास करण्याची गरज पडणार नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. 
- संजीव नाईक, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: new mumbai passport office