नवी मुंबईला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद
नवी मुंबईत दोन दिवस पावसाने चांगला जोर धरला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत नवी मुंबईत कमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षात झाली आहे. यावेळी १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान एकंदर १९२५.४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान २०४२.१६ मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली होती. 

नवी मुंबई - आठवडाभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाची शनिवारपासून संततधार सुरू झाली. त्यामुळे शहरातील रस्तेदुरुस्ती पुन्हा खड्ड्यांत गेली. शहराच्या काही भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. दोन दिवसांत नवी मुंबईत १६८.५४ मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली. एकसारखा पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनीही वीक एण्डचा आनंद लुटला. पावसामुळे लोकल उशिराने धावत होत्या. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे नागरिकांनी घरीच बसणे पसंत केल्याने बाजारात शुकशुकाट होता.

शुक्रवारपर्यंत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही कायम होता. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. नवी मुंबईत सतत दोन दिवस सुरू असलेल्या पावसाची १६८.५४ मिमी एवढी नोंद झाली आहे. पावसामुळे नवी मुंबईत चार ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात वाशी सेक्‍टर १० व सेक्‍टर ८, नेरूळ सेक्‍टर ११ व ऐरोली येथील सम्राटनगरमध्ये झाडे कोसळल्याच्या घटनांची आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंद झाली आहे. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी पावसाने चांगला जोर धरल्यामुळे सुटीत फिरायला जाण्याचा बेत आखणाऱ्या अनेकांनी घरी बसूनच पावसाचा आनंद लुटला. पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाल्यामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळित झाले होते. पावसामुळे नागरिकांनी घरीच बसणे पसंत केल्याने रविवारी दिवसभर बाजारातही शुकशुकाट होता.

मोरबेत ८६.७३ मीटर जलसाठा
राज्यभरात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक धरणे भरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. मात्र नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण भरून वाहण्यास आणखी पावसाची गरज आहे. मोरबेची क्षमता ८८ मीटरची आहे. १ जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८१२.८० मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ८६.७३ मीटरवर पोहोचली आहे. परंतु हे धरण ओसंडून वाहण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

जुईनगर-शिरवणे भुयारी मार्गात पाणी
बेलापूर - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जुईनगर आणि शिरवणेला जोडणाऱ्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे येथे शनिवारी आणि रविवारी अनेक दुचाकी आणि रिक्षा बंद पडल्या होत्या. 

पाण्यामुळे वाहने बंद पडत असल्यामुळे अनेक वाहनचालक मार्ग बदलून राजीव गांधी उड्डाणपुलावरून वळसा घालून जाणे पसंत करीत होते. हलक्‍या आणि लहान वाहनांसाठी हा भुयारी मार्ग आहे. त्याच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी कठडा बांधला आहे; परंतु या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथून नागरिकांनाही ये-जा करणे कठीण झाले. वाहनांमुळे चिखल आणि घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडून कपडे खराब होत होते. या भुयारी मार्गाच्या एका बाजूला शिरवणे गाव आणि दुसऱ्या बाजूला जुईनगर आहे. ही दोन्ही ठिकाणे उंचावर आहेत. रेल्वेमार्गाखालून हा भुयारी मार्ग जातो. हा भाग सखल असल्याने तेथील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: new mumbai rain