मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष तिकिटगृह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

तिकिट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या 27 रेल्वे स्थानंकांत उभारणार अत्याधुनिक सोयींयुक्त तिकिटगृहे. 

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीस्कर करण्याकरीता मध्य रेल्वे तिकिट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्याकरीता अत्याधुनिक सोयींयुक्त विशेष तिकिटगृह उभारणार आहे. यात मध्य रेल्वेच्या 27 रेल्वेस्थानकांचा समावेश असून या सर्व स्थानकांवर मिळूण एकूण 68 विशेष तिकीटगृहे उभारण्यात येणार आहेत.

या तिकिटगृहांमुळे एटीव्हीएम, जेटीबीएस आणि मोबाईल स्कॅन करून तिकीट घेण्याची सुविधा प्रवाशांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकांतील तिकीट खिडक्‍यांवरील लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यात एटीव्हीएम, जेटीबीएस, अधिकृत तिकीट देणारे एजंट, मोबाईल स्कॅन करण्यासाठी बारकोड या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्याने दाखल झालेल्या तिकीट मशीनदेखील या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याने अवघ्या काही सेकंदात प्रवाशांना लोकलचे तिकीट उपलब्ध होणार असल्याचे देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीएसएमटी, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनससह प्रवासी वर्दळ जास्त असलेल्या 27 रेल्वेस्थानकांवर एकूण 68 तिकीटगृहे उभारण्यात येणार आहेत. तिकीटगृहे उभारण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना वर्कऑर्डर देण्यात आली असून येत्या तीन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही तिकीटगृहे सुरू झाल्यानंतर तिकीट खिडक्‍यांवरील प्रवाशांची रांग कमी होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new railway ticket houses will build on central railway stations