esakal | होम क्वारंटाइन रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा नवा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

होम क्वारंटाइन रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा नवा निर्णय

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असून अनेक रूग्ण गृह विलगीकरणात

होम क्वारंटाइन रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा नवा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: कोरोनाचा विषाणू पुन्हा एकदा महाराष्ट्रात आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा हे चिंतेचे कारण ठरत आहे. अनेक जिल्ह्यातील नेतेमंडळींनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे, गृह विलगीकरणात म्हणजेच होम क्वारंटाइन असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आतापर्यंत महाराष्ट्रात किती लोकांना मिळाली लस? शासनाने दिलं उत्तर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रूग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. विविध पालिकांनी आपल्याजवळील वैद्यकीय सेवांची उपलब्धता पाहून हा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसात होम क्वारंटाइन असलेले रूग्ण थेट रस्त्यावर फिरत असल्याचे दिसले. त्यावरून सरकार आणि प्रशासनावर टीकादेखील करण्यात आली. त्यामुळे आता आवश्यकता भासल्यास होम क्वारंटाइन रूग्णाच्या सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जानेवारीच्या अखेरपासून पावलं का नाही उचलली? राज ठाकरेंचा सवाल

"कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत", अशी माहिती त्यांनी दिली.

अधिकाऱ्यांना विशेष सूचना

"मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत. कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. उपचारांचा व इतर सुविधांचा दर्जा चांगला राहील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः भेट द्यावी. उन्हाळा सुरू झाल्याने पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत. तसेच वीजेची उपकरणे वापरताना कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी", असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

Coronavirus: ५० हजार ते १ लाख डिपॉझिट घेणाऱ्या रुग्णालयांना राजेश टोपेंचा इशारा

महापालिकांमध्ये निधीचा तुटवडा असल्यास...

"रक्ताचा पुरवठा नियमितपणे व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्ष, पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. गर्दीचे नियमन करावे, मास्क परिधान करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, रिक्त पदे त्वरित भरावीत. ज्या महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना निधीची गरज आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवावेत. त्यांना डीपीडिसी आणि एसडीआरएफमधून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करण्यात येईल. तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल", अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

(संपादन- विराज भागवत)

loading image