नवे मुख्य सचिव सुमीत मलिक यांनी पदभार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - ज्येष्ठ सनदी अधिकारी सुमीत मलिक यांनी आज राज्याच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सूत्रे सुपूर्त केली. भारतीय प्रशासन सेवेतील 1982 च्या तुकडीचे अधिकारी असलेले मलिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. मुख्य सचिवांच्या दालनात आज सायंकाळी मलिक यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरवात केली. या वेळी क्षत्रिय यांनी मलिक यांचे स्वागत केले.

मलिक हे मूळचे कोलकता येथील आहेत. उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले मलिक हे संवेदनशील लेखक, कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. लेखनाचा छंद असलेले मल्लिक यांनी इतिहास या विषयामधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर जगप्रसिद्ध वेल्स विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि विकासात्मक अभ्यास या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवीही संपादन केली. 1982 मध्ये ते भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. 1983 मध्ये नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरवात झाली.

Web Title: new secretory sumit malik in working