मोनोसाठी वडाळा डेपोची जागा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

१५ एकरांवर निवासी, वाणिज्यिक टॉवर उभारण्याचा प्रस्ताव

मुंबई : तोट्यात असलेल्या मोनो रेल्वेला सावरण्यासाठी वडाळा डेपोची जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विचाराधीन आहे. निवासी आणि वाणिज्यिक टॉवर उभारण्यासाठी वडाळा डेपोतील १५ एकर जमीन वापरण्याचा प्रस्ताव आहे. 

मोनोच्या चेंबूर-वडाळा-सातरस्ता या मार्गावर दिवसाला सुमारे १८ हजार नागरिक प्रवास करतील असा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात मोनोचा चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा तोट्यात असून, या मार्गावर दररोज सुमारे ८.५ कोटींचे नुकसान एमएमआरडीएला सहन करावे लागते. हे नुकसान भरून काढण्यासाठी वडाळा डेपोतील कारशेड वगळून उर्वरित भागावर तीन निवासी आणि वाणिज्यिक टॉवर उभारून निधी मिळवण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे. 
निवासी संकुलातील काही सदनिका कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले जातील आणि उरलेल्या घरांची बाजारभावाने विक्री करण्यावर भर दिला जाईल. वाणिज्यिक टॉवर भाडेतत्त्वावर दिल्यामुळेही एमएमआरडीएच्या तिजोरीत मोठी भर पडेल. जमिनीची किंमत ठरवणे आणि आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले.

जाहिरातींचा हातभार
फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झालेल्या मोनोरेल्वेचा पहिला टप्पा सुरुवातीपासूनच तोट्यात आहे. एमएमआरडीएने जाहिरातींसाठी मोनोचे डबे आणि स्थानके भाडेतत्त्वावर देण्याबाबतही निविदा काढल्या आहेत. मेट्रो- १ च्या घाटकोपर-वर्सोवा मार्गावर केलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर मोनोला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मोनो ठरतेय पांढरा हत्ती?
बिल्डरांच्या फायद्यासाठी मुंबईत मोनोरेल प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान आजूबाजूच्या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली. त्यामुळे या भागातील जागांच्या किमती गगनाला भिडल्या असून, बिल्डरांचे कल्याण झाले असे बोलले जाते. मोनो प्रकल्पात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातो. मुंबईला मोनोरेलची गरज होती का? गरज असल्यास हा प्रकल्प नक्की कुठे व्हायला हवा होता? याबाबतचे निकष विचारात घेतले होते का, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.  मोनोसाठी कोट्यवधी खर्च करूनही प्रवाशांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new space for wadala