esakal | राणीच्या बागेत आले नवीन पाहुणे  
sakal

बोलून बातमी शोधा

राणीच्या बागेत आले नवीन पाहुणे  

राणीच्या बागेत आले नवीन पाहुणे  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईचे वैभव असलेल्या राणीच्या बागेत दोन पट्टेरी वाघ आज दाखल झाले आहेत. या वाघांच्या जोडीमुळे तब्बल 20 वर्षांनंतर राणीबागेत डरकाळी पुन्हा ऐकायला मिळणार आहे. या नव्या पाहुण्यांसाठी विशेष पिंजरे बनवण्यात येत असून, त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात येईल. त्यामुळे वाघांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी पर्यटकांना एक महिना वाट पाहावी लागणार आहे. 

हेही वाचा - पैशाच्या वादातून त्यांनी आवळला बारमालकाचा गळा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीची बाग मुंबईकर आणि पर्यटकांचे, विशेषत: बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. या प्राणिसंग्रहालयात एके काळी वाघ आणि सिंहांचा वावर होता; परंतु अनिता व जिमी या सिहिंणी आणि एका वाघाचा 20 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर राणीबागेत वाघ-सिंहांचे अस्तित्व नव्हते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत होता. आता औरंगाबाद येथील सिद्धार्थ अभयारण्यातून "शक्ती' आणि "लक्ष्मी' या वाघांच्या जोडीचे गुरुवारी आगमन होत आहे. वाघांना औरंगाबादवरून मुंबईत आणण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी - फडणवीसांना आणखी एक धक्का

महापालिका प्रशासनाने राणीची बाग आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही वर्षांपासून पुनर्विकासाचे काम सुरू आहे. दीड वर्षापूर्वी हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढू लागली. काही दिवसांपूर्वीच बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या आदी प्राणी दाखल झाले आहेत. राणीबागेच्या प्रशासनाने देशी-विदेशी प्राणी आणि पक्षी आणण्यासाठी वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून दोन सिंह आणि औरंगाबाद महापालिका प्राणिसंग्रहालयातून वाघाची जोडी येत आहे. राणीबागेत येणाऱ्या नवीन पाहुण्यांसाठी आठ नवीन पिंजरे उभारण्यात आले आहेत. 

वन्यप्राण्यांनी गजबजणार 

सध्या राणीच्या बागेत बारशिंगे, तरस, बिबट्या, अस्वल आदी प्राणी आणण्यात आले आहेत. आता वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांतून 10 काळविटे, बारशिंग्यांच्या तीन जोड्या, नर-मादी पाणघोडा, तीन कोल्हे, तीन लांडगे आणले जाणार आहेत. कानपूरहून काळविटाच्या जोड्या व पाणघोडे, लखनऊमधून बारशिंगे, सुरतमधून कोल्हे आणि जोधपूरहून लांडगे दाखल होणार आहेत. 

रणथंबोर किल्ल्याची प्रतिकृती 

वाघांच्या जोडीला ठेवल्या जाणाऱ्या पिंजऱ्यात राजस्थानमधील रणथंबोर किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. राणीच्या बागेत दाखल झाल्यानंतर या वाघांना काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर महिनाभराने पर्यटकांना वाघांचे दर्शन घेता येईल, अशी माहिती राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. 

web title : new tiger will arrive in the Queen's garden today