नववर्षाच्या आनंदावरही विरजण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नोटाबंदीचा पर्यटन, हॉटेल व्यवसायावर परिणाम
मुंबई - डिसेंबर सुरू झाल्यानंतर वेध लागतात ते नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे; पण या वेळी नोटाबंदीचा फटका इथेही बसला आहे. कुणाच्याच खिशात मोठी रोख रक्कम नसल्याने पार्टी करायची कशी किंवा बाहेरगावी फिरायचे तरी कसे, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर एटीएमच्या रांगेत गेल्यामुळे अनेकांचा मूड गेला आहे. परिणामी, वर्षाच्या अखेरीस हॉटेल बुकिंगवर 30 ते 40 टक्के परिणाम झाला आहे.

केवळ फिरायला जाण्यावरच नाही, तर शॉपिंगवरही गदा आली आहे. शॉपिंगच्या उत्साहावर दोन हजारच्या गुलाबी नोटेने बोळा फिरवला आहे.

एटीएममधून दररोज ही एकच नोट बाहेर पडत आहे. ऑनलाईन "पेटीएम'सारखे पर्याय अजून सगळ्यांच्या अंगवळणी पडलेले नाहीत. डिसेंबरच्या सुरुवातीलाच एमटीडीसीसह सर्व रिसॉर्टचे आरक्षण संपते. भंडारदरा, गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्‍वर, कार्ला, चिखलदरा, ताडोबा, तारकर्ली, वेळणेश्‍वर येथील रिसॉर्टना अधिक मागणी असते. यंदा येथील रिसॉर्ट आणि हॉटेलांचे मालक ग्राहकांची वाट पाहत आहेत.

अनेकांनी आधी केलेले हॉटेलांचे आरक्षण आता रद्द केले आहे. पर्यटनाची हौस असलेल्या मुंबईतील अभय शिंदे यांनी गेल्या वर्षी तारकर्ली, गोव्याला जाण्याचे नोव्हेंबरमध्येच ठरवले होते. यंदा ते ताडोबाला जाणार होते. आता त्यांनी हा बेत रद्द केला आहे. दिवाळीत शॉपिंग सुरू केले होती; पण आता कुठेही जाणार नाही. नव्या ठिकाणी पर्यटनस्थळी एटीएम सापडले नाही, तर पैशांची चणचण भासेल, असे ते म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे यंदाचा सीझन पूर्ण ठप्प झाला आहे. 15-20 टक्केच हॉटेल बुकिंग झाले आहे. ग्रुप बुकिंग अचानक रद्द होत आहे. हॉटेल स्टेसोबत इतर ऑफर देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
- प्रसाद पाटील, हॉटेल व्यावसायिक, किंगराईज, महाबळेश्‍वर

कॅशलेस व्यवहाराचा परिणाम जाणवत आहे. ग्रुप बुकिंग, प्रवासासाठी खासगी कार, शॉपिंग डेस्टिनेशन अशा सवलती जाहीर केल्या आहेत. गेल्या वर्षीइतका प्रतिसाद यंदा मिळेनासा झाला आहे. सुट्या पैशांची चणचण याला कारणीभूत आहे. आम्हीही ग्राहकांची वाट पाहत आहोत.
- राजेश सावंत, समुद्रमहल रिसॉर्टचे मालक, तारकर्ली

Web Title: new year effect by currency ban