नूतन वर्ष 13 महिन्यांचे! पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती 

दीपक शेलार
रविवार, 18 मार्च 2018

पुढील 10 वर्षांतील गुढीपाडव्याचे दिवस पुढीलप्रमाणे शनिवार 6 एप्रिल 2019, बुधवार 25 मार्च 2020, मंगळवार 13 एप्रिल 2021, शनिवार 2 एप्रिल 2022, बुधवार 22 मार्च 2023, मंगळवार 9 एप्रिल 2024, रविवार 30 मार्च 2025, गुरुवार 19 मार्च 2026, बुधवार 7 एप्रिल 2027 आणि सोमवार 27 मार्च 2028 मध्ये गुढीपाडवा येणार आहे.  

ठाणे : हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र मासाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र शुक्‍ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, त्यानुसार रविवारी शालिवाहन शके 1940 विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या हिंदू नूतन वर्षात ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने यंदाचे वर्ष 13 महिन्यांचे आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. 

नूतन वर्षाविषयी माहिती सांगताना सोमण म्हणाले, "यंदाचे हे नूतन वर्ष 18 मार्च 2018 पासून शुक्रवार, 5 एप्रिल 2019 पर्यंत असणार आहे. यावर्षी अधिक ज्येष्ठ मास 16 मे पासून 13 जूनपर्यंत असेल. त्यामुळे वटपौर्णिमेपासून सर्व सण तब्बल 20 दिवस उशिरा येतील. या वर्षात एकूण तीन सूर्यग्रहणे व दोन चंद्रग्रहणे होणार आहेत. शुक्रवार 23 जुलैचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल; मात्र 13 जुलैचे आणि 11 ऑगस्टचे खंडग्रास सूर्यग्रहण, 2019 मध्ये 5 जानेवारीला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि 21 जानेवारी खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. 

सोने खरेदीदारांसाठी या नव्या वर्षात 9 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 4 ऑक्‍टोबर असे गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेशभक्तांसाठी 3 एप्रिल, 31 जुलै आणि 25 डिसेंबर अशा एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहेत. या वर्षामध्ये विवाहोत्सुकांसाठी वैशाख, निज ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. 

आता 2025 मध्ये रविवारी गुढीपाडवा 

यंदाचा गुढीपाडवा रविवारी आला असून, असाच रविवार योग तब्बल सात वर्षांनी म्हणजेच 30 मार्च 2025 रोजी येणार आहे. पंचागकर्ते सोमण यांनी सांगितल्यानुसार, पुढील 10 वर्षांतील गुढीपाडव्याचे दिवस पुढीलप्रमाणे शनिवार 6 एप्रिल 2019, बुधवार 25 मार्च 2020, मंगळवार 13 एप्रिल 2021, शनिवार 2 एप्रिल 2022, बुधवार 22 मार्च 2023, मंगळवार 9 एप्रिल 2024, रविवार 30 मार्च 2025, गुरुवार 19 मार्च 2026, बुधवार 7 एप्रिल 2027 आणि सोमवार 27 मार्च 2028 मध्ये गुढीपाडवा येणार आहे.  

 
 

Web Title: New Year will be 13 months says D K soman