आणखी 15 दिवस मासेमारी धोक्‍याची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अलिबाग : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंदीवर बंदी असते. ती सरकारी आदेशानुसार बुधवारी (ता.31) संपत असल्याने रायगड जिल्ह्यातील मासेमारीसाठी बंदरे गजबजू लागली आहेत; परंतु समुद्र अजूनही खवळलेला असल्याने किमान 15 दिवसांनंतरच मासेमारीला सुरुवात करावी, असा सल्ला मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. 

अलिबाग : वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंदीवर बंदी असते. ती सरकारी आदेशानुसार बुधवारी (ता.31) संपत असल्याने रायगड जिल्ह्यातील मासेमारीसाठी बंदरे गजबजू लागली आहेत; परंतु समुद्र अजूनही खवळलेला असल्याने किमान 15 दिवसांनंतरच मासेमारीला सुरुवात करावी, असा सल्ला मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. 

खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदीचा कालावधी संपत असल्याने साखर-आक्षी, दिघोडी, सासवणे, करंजा, आगरदंडा-दिघी, बोर्ली-मांडला, जीवना बंदरातील मच्छीमारांनी नौका बंदरात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नौकांवरील खलाशी, कामगार (बापे) दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा परतले आहेत. त्यामुळे बंदरातील लगबग पुन्हा सुरू झाली आहे; परंतु वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मासेमारी धोक्‍याची ठरू शकते. या दृष्टीने मच्छीमारांनी आणखी 15 दिवस प्रतीक्षा करावी, असे आवाहन मत्स्य विभागाचे अधिकारी करत आहेत. 

पावसाळ्यात का असते बंदी? 
मान्सूनचा सुरुवातीचा कालावधी हा मत्स्यजीवांच्या प्रजननासाठी योग्य असतो. या दरम्यान मासेमारी केल्यास समुद्रातील मत्स्यजीवांची संख्या घटत असल्याने दर वर्षी या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यावर्षी ही बंदी 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांसाठी होती. 

नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार होती; परंतु समुद्र अद्याप खवळलेला असल्याने मच्छीमारांनी सावधानता बाळगणे योग्य ठरणार आहे. यासाठी हवामानाचा अंदाज घेऊनच मासेमारीसाठी उतरावे. 
- अभयसिंह शिंदे- इनामदार, 
सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय 

खोल समुद्रात वादळी वाऱ्यामुळे लाटा उसळत आहेत. नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीसाठी वातावरण पोषक होईल. तोपर्यंत मासेमारीसाठी नौका समुद्रात सोडणे योग्य नाही. मच्छीमारांनी चांगल्या वातावरणाची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल. 
- मनोहर बैले, चेअरमन, सागरकन्या मच्छीमार सोसायटी, मुरूड 

मागील हंगामातील शेवटच्या दिवसात वादळामुळे नौका लवकर बंदरात आणाव्या लागल्या होत्या. यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला. नौकांची दुरुस्ती, नव्या जाळ्यांसाठी करावा लागलेला खर्च भरून काढण्यासाठी नव्या हंगामात वेळेत मासेमारी सुरू होणे गरजेचे होते; परंतु खराब वातावरणाचा फटका सुरुवातीलाच बसत आहे. यामुळे यावर्षीही तोटा सहन करावा लागणार आहे. 
- श्रीरंग नाखवा, मच्छीमार, अलिबाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Next 15 days fishing is dangerous