ठाण्यासाठी पुढील 20 वर्षांचे नियोजन, काय आहे नियोजन? वाचा सविस्तर

ठाण्यासाठी पुढील 20 वर्षांचे नियोजन, काय आहे नियोजन? वाचा सविस्तर

ठाणे : "स्मार्ट सिटी' म्हणून उदयाला येत असलेल्या ठाणे शहराला पाण्याची चणचण भासू नये यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुढील वीस वर्षांत शहराची लोकसंख्या वाढणार आहे. किमान 35 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होऊ शकेल, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), स्टेम आणि भातसा धरणातून अतिरिक्त पाणी उचलण्याच्या परवानगीसाठी पालिकेचे प्रयत्न असून, महापौर नरेश म्हस्के यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

आजघडीला ठाणे शहराला 490 लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा वाढवून भविष्यातील 35 लाख लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी मिळण्यासाठी स्टेम आणि एमआयडीसीकडे महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असल्याने या पत्रव्यवहाराला लवकरच मूर्त स्वरूप येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत महापौर नरेश म्हस्के यांना नगरविकास मंत्री शिंदे यांच्याबरोबर या विषयावर बैठक घेण्यासाठी साकडे घातले आहे. 

ठाणे शहराला होणाऱ्या 490 लाख लिटर पाणीपुरवठ्यामध्ये स्टेमकडून 110, स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 210, मुंबई महापालिकेकडून 60 आणि एमआयडीसीकडून 110 लाख लिटर पाणी मिळते. परंतु एवढे पाणी मिळत असतानाही केवळ पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक विभागात पाणीटंचाई भेडसावते.

शहरात आजही काही ठिकाणी कमी दाबाने; तर काही ठिकाणी जास्त दाबाने पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी 20 ते 25 वर्षे जुन्या जलवाहिन्या असल्याने त्याचाही परिणाम होऊन योग्य प्रकारे पाणीपुरवठा होत नाही. एकूणच याचा परिणाम म्हणून काही भागांना सुरळीत; तर काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळेच शहरातील वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन महापालिकेने आता वाढीव पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

एमआयडीसीकडून 100 लाख लिटर, भातसामधून स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव 100 एमएलडी आणि स्टेमकडून वाढीव 50 एमएलडी असा 250 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहेत. त्यानुसार 2017 पासून लघु पाटबंधारे विभागाकडे 4 वेळा आणि एमआयडीसीकडे 2018 पासून 3 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

ही परवानगी मिळणार असल्याचे गृहीत धरून पालिकेच्या पाणीपुरवठ्याची साठवणूक क्षमता वाढविण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या असलेल्या 27 जलकुंभांच्या जोडीला अजून 57 जलकुंभ तयार होणार आहेत. त्यामुळे पूर्वी असलेली साठवणुकीची क्षमता ही 21 टक्‍क्‍यांवरून 43 टक्‍क्‍यांवर जाईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. 

शुक्रवारी ठाण्याचा पाणी पुरवठा बंद 
ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शुक्रवारी (10 जानेवारी) सकाळी 9 ते शनिवारी (11 जानेवारी) सकाळी 9 वाजेपर्यंत पालिकेचा स्वतःचा पाणीपुरवठा व स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com