न्हावा गाव परिसरात चिटफंड घोटाळा ; 19 जणांना फसवले, एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

महेश पाटील याने न्हावा गाव परिसरात महालक्ष्मी क्रिएशन्स संस्थेद्वारे नागरिकांकडून 72 लाख रुपये जमा केले होते. 
14 वर्षांपासून हे पैसे गोळा करताना महेशने महिन्याला दीड टक्का याप्रमाणे वार्षिक 18 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले.

उरण : येथील न्हावा शेवा पोलिस ठाणे हद्दीतील न्हावा गाव आणि परिसरातील नागरिकांना वार्षिक सुमारे 18 टक्के व्याजाचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या एका ठगाला न्हावा शेवा पोलिसांनी गजाआड केले. 

महेश पाटील याने न्हावा गाव परिसरात महालक्ष्मी क्रिएशन्स संस्थेद्वारे नागरिकांकडून 72 लाख रुपये जमा केले होते. 
14 वर्षांपासून हे पैसे गोळा करताना महेशने महिन्याला दीड टक्का याप्रमाणे वार्षिक 18 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. याला बळी पडून गावातील आणि परिसरातील अनेकांनी पाटीलकडे गुंतवणूक केली. त्या बदल्यात अनेकांना त्याने रिटर्नचे चेकही दिले; मात्र बहुतेकांना संपर्क करून तो चेक बॅंकेत जमा करू नका, थोडे दिवस थांबा, असे विनवत होता. यावर विश्‍वास ठेवून अनेकांनी चेक बॅंकेत भरले नाहीत; मात्र सातत्याने असेच होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील सुमारे 19 जणांनी न्हावा शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर महेश पाटील याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला शनिवारी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता, 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद पवार यांनी दिली. 

Web Title: Nhava Village Cheat Fund Scam 19 People