पोलिस ठाण्यातून पळालेला नायजेरियन अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - अमली पदार्थाची तस्करी केल्याबद्दल शिक्षा भोगून आलेला जॉन केनेडी ओकोरो हा नायजेरियन नागरिक पोलिस ठाण्यातून पळून गेला होता. त्याला गुरुवारी (ता. 5) रात्री नालासोपारा येथून अटक करण्यात आली. तो नालासोपारा येथे राहत होता. पोलिसांना चकवा देण्याकरता त्याने केशरचना बदलली होती. न्यायालयाने त्याला 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

जॉन हा नायजेरियातून तीन वर्षांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत असताना तो अमली पदार्थ तस्करी करताना पकडला गेला होता. त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगल्यावर त्याला नाशिक तुरुंगातून रविवारी (ता. 1) मुंबईत आणण्यात आले होते. सोमवारी (ता. 2) पहाटे त्याने पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. त्याच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत होती. 

पोलिस ठाण्यातून पळ काढल्यावर त्याने सीएसटी येथून टॅक्‍सी पकडली. वांद्रे येथे तो एका व्यक्तीकडे रात्री राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकल पकडून नालासोपाऱ्याला गेला. तिथे त्याने केशरचना बदलली. नालासोपाऱ्यातून तो बंगलूरुला पळून जाणार होता. बुधवारी रात्री बोरिवलीहून तो खासगी बसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने बोरिवलीत सापळा रचला; मात्र ती बस रद्द झाल्याने तो बोरिवलीहून नालासोपाऱ्याला गेला. गुरुवारी (ता. 5) सायंकाळी जॉन पुन्हा बोरिवलीत आला आणि पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. केशरचना बदलल्यामुळे पोलिसही त्याला आधी ओळखू शकले नाहत. पोलिस जॉनला पळून जाण्यास मदत करणाऱ्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: Nigerian arrested