अंमली पदार्थाची तस्करी प्रकरणी नायझेरीयन गजाआड; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

प्रमोद जाधव
Friday, 29 January 2021

मेफेड्रोन आणि गांजाची तस्करी करणाऱ्या एका नायझेरीयन नागरिकासह कर्जत येथील सराईत गुन्हेगाराला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

अलिबाग  : मेफेड्रोन आणि गांजाची तस्करी करणाऱ्या एका नायझेरीयन नागरिकासह कर्जत येथील सराईत गुन्हेगाराला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. कारवाईमुळे अंमली पदार्थाची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघड होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील खालापूर, कर्जत परिसरात स्थानिकांच्या मदतीने काही परदेशी नागरिक अंमली पदार्थाची तस्करी करतात. तरुण वर्गाला ते लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती रायगड पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. पोलिस नाईक स्वप्नील येरुणकर यांनी त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळवली. त्यानुसार अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप पोमण, श्रीकृष्ण नावले, उपनिरीक्षक महेश कदम, अंमलदार पांडुरंग पाटील, राजेंद्र दुसाणे, भानुदास कराळे, हणुमंत सुर्यवंशी, प्रशांत दबडे, स्वप्निल येरुणकर, सुनिल खराटे, राजेंद्र गाणार, संदीप चव्हाण, अनिल मोरे यांचे पथक तयार केले. या पथकाद्वारे 26 जानेवारीला रसायनी येथील मोहपाडा येथे सापळा रचण्यात आला. यामध्ये एक भारतीय व एक नायझेरीन असे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे एक लाख 11 हजार 10 रुपये किंमतीचे मेफेड्रोन आणि गांजा आढळून आला. त्यामध्ये मेफेड्रोन 19 ग्रॅम व गांजा 150 ग्रॅम वजनाचा असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकजण कर्जत येथील रहिवासी असून त्याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात हाणामारी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच एक आरोपी हा नायझेरीयन नागरीक असल्याने यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी निष्पन्न होण्याची दाट शक्‍यता असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Nigerian jailed in ban chemical case Action of Raigad Local Crime Branch

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigerian jailed in ban chemical case Action of Raigad Local Crime Branch