नाईकांचे नगरसेवक फुटणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणारे ५५ नगरसेवक फार काळ नाईकांसोबत राहण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.

नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणारे ५५ नगरसेवक फार काळ नाईकांसोबत राहण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी नाईकांना ५५ नगरसेवकांचे बळ तयार करण्यात यश आले आहे. याच नगरसेवकांचा विभागीय कोकण आयुक्तांकडे गट स्थापन केला जाणार आहे; मात्र या गटाची मुदत फक्त पुढील महापालिकेच्या निवडणूकांपुरतीच असल्याने त्यानंतर नगरसेवकांना कुठेही जाण्यास रान मोकळे आहे. त्यामुळे भविष्यात भाजपला पुन्हा उतरती कळा लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

संदीप नाईकांच्या प्रवेशाला एक महिना लोटला तरी गणेश नाईकांकडून प्रवेशाचा ठोस निर्णय नगरसेवकांना कळवला जात नसल्याने बहुतांश नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी येणाऱ्या गणेश नाईकांच्या या नगरसेवकांसोबत भेटी-गाठीही घेतल्या जातात. मात्र, कधीच प्रवेशाबाबत अवाक्षरसुद्धा काढले जात नाही. त्यामुळे प्रवेशाच्या प्रकरणात पारदर्शकता राहिली नसल्याने अनेक नगरसेवकांना पुढील भवितव्याची काळजी सतावू लागली आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रभागाच्या शेजारच्या प्रभागातील परस्पर विरोधी असलेल्या नगरसेवकासोबतही काही नगरसेवकांची हात मिळवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. काही नगरसेवकांनी तर स्वतःच्या प्रभागातील नागरिकांसोबत सल्लामसलत करण्यासही सुरुवात केली आहे. 

शिवसेनेला अच्छे दिन 
भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष, नवी मुंबई शहराला पार्श्‍वभूमी असलेल्या शिवसेनेला बहुतांश नगरसेवकांची पसंती आहे. तुर्भे, वाशी, कोपरखैरणेतील काही नगरसेवक ऐनवेळी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच नाईकांकडूनही या नगरसेवकांना फक्त प्रवेशापुरतेच आश्‍वासन दिले जात असल्याने नगरसेवकांकडून इतरही पक्षांचा पर्यायाची चाचपणी सुरु आहे.

प्रवेशाच्या वावड्या
संदीप नाईक यांच्या प्रवेशानंतर महिनाभर गणेश नाईकांच्या प्रवेशाच्या चर्चा नवी मुंबई शहरात रंगल्या आहेत. नाईक ५५ नगरसेवकांना घेऊन जाणार असल्याचेही शहरातील काही प्रसिद्धिमाध्यमांकडून बोलले जात आहे. त्यानुसार गट स्थापन करण्यासाठी काही नगरसेवकांचे छायाचित्र घेण्यात आले आहेत; मात्र पुढील आमंत्रण न आल्याने अनेकांनी शुक्रवारी घरीच आराम करण्याला पसंती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nike's councillor may be split?