एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले

बेलापूरहून खोपोलीला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; बहुतांश फेऱ्या विलंबाने
nmmt
nmmtsakal

नवी मुंबई : एनएमएमटी प्रशासनाने खास लोकाग्रहास्तव बेलापूर ते खोपोली मार्गावर सुरू केलेल्या बसचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना फटका बसतो आहे. बेलापूर डेपोत संध्याकाळी बस वेळेवर येत नसल्याने खोपोली मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल दोन तास वाट पाहत बसावी लागते. बऱ्याचदा कोणतीही पूर्वकल्पना न देताच बस रद्द केली जाते. अखेर मिळेल त्या पर्यायी वाहनाने प्रवाशांना घर गाठावे लागते. तळोजा, कल्‍याण मार्गावर धावणाऱ्या प्रवाशांनाच असाच मनस्ताप सहन करावा लागतो.

एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्याने रायगड जिल्ह्यातून नवी मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीकरिता एनएमएमटीने खोपोली मार्गावर ५८ क्रमांकाची बस सुरू केली आहे. सकाळी, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत धावणाऱ्या या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र गेले सहा दिवस बस बेलापूर डेपोत उशिराने येत आहे.

बेलापूरहून खोपोलीच्या दिशेने संध्याकाळी ७.१५ वाजता सुटण्याची वेळ असतानाही गाडी नेहमी ८.१५ वाजल्यानंतर येते. बस थांब्यावर उभ्या प्रवाशांनी बेलापूर बस डेपोतील नियंत्रकांकडे विचारणा केल्‍यावर एनएमएमटीकडून बस उपलब्ध करण्यात येते. तोपर्यंत प्रवाशांना दोन-दोन तास वाट पाहावी लागते. बऱ्याचदा गाडी परस्‍पर रद्द केली जाते, याची कल्‍पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्‍यानंतर ८.१५ वाजल्यानंतर बस पाठवली जाते. गेल्‍या काही दिवसांपासून असेच सुरू असल्‍याने प्रवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

ॲपवरून बस गायब

बस थांब्यांवरील प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन पाहण्याची सुविधा मिळावी याकरिता एनएमएमटी प्रशासनाने बस ट्रॅकर ॲप तयार केले आहे. बरेचसे प्रवासी बस कुठे आहे, हे पाहण्यासाठी ॲपच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशन पाहतात. नियोजित वेळी बस ॲपवर दिसते, मात्र वेळ उलटून गेली आणि बस थांब्‍यावर आली नाही तर अॅपवर लोकेशन दिसत नाही. ॲपवरून बस आपोआप गायब होते. त्यामुळे वाट पाहणाऱ्या प्रवाशांकडे ताटकळत राहण्याशिवाय पर्याय नसतो.

बसला चांगला प्रतिसाद

बेलापूरहून बस थांब्यावर ही बस खोपोलीच्या दिशेने जाताना रोज भरून जाते. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  पनवेल ते खोपोली या अंतराकरिता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट दर ५५ रुपये आहे, तर बेलापूर - खोपोली असा एनएमएमटी बसवे तिकीट अवघे ५५ रुपये, पनवेलहून खोपोलीला एनएमएमटीतून जाण्यासाठी ४५ रुपये तिकीट असल्याने या बसला अधिक प्रतिसाद मिळत आहे.

चार्जिंग बसची समस्या निर्माण झाल्याने त्या मार्गावरच्या सीएनजी बस वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नवीन मार्गावर बस पाठविण्यात विलंब व्हायचा, परंतु दोन दिवसांत हा प्रश्न सुटेल.

- योगेश कडुस्कर, व्यवस्थापक, एनएमएमटी

एनएमएमटीने खोपोली मार्गावर बस सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, पण गेले आठवडाभर बेलापूर बस डेपोत रोज बस उशिराने येत आहे. बऱ्याचदा दोन तास वाट पाहावी लागते. नंतर अचानक बस रद्द करून थेट ८.१५ वाजल्याची बस येते.

- सचिन मोहिते, प्रवासी

कल्याण-बेलापूर मार्गावरील प्रवासीही त्रस्त

एनएमएमटीने कल्याण ते बेलापूर एमआयडीसीमार्गे अशी ७१ क्रमांकाची बस सेवा प्रवाशांसाठी सुरू केली आहे. ही बस कळंबोली-रोडपाली येथून येत असल्याने येथील रहिवाशांना कल्याण अथवा बेलापूर, खारघरला जाण्यास सोईस्कर ठरते. सिडको प्रकल्पातील रहिवाशांना ही बस सोयीची आहे. मात्र बहुतांश वेळा बस विलंबाने असते. तर काही वेळा रद्द केली जाते. त्‍यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रिक्षाचे भाडे जास्त असल्याने बसची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com