घोटी टोलनाक्‍यावर मारहाण नाही - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

ठाणे - घोटी येथील टोलनाक्‍यावर मंगळवारी (ता. 24) मध्यरात्री घडलेला प्रकार दुर्दैवी आहे; मात्र बेदम मारहाण झाल्याचे जे चित्र रंगवले जात आहे, ते वस्तुस्थितीला धरून नाही. अनेक वर्ष मी सार्वजनिक आयुष्यात असून माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडून कधीही अनुचित कृती घडलेली नाही. माझी गाडी कधी सिग्नल तोडत नाही. टोलनाक्‍यांवरही रांग सोडून जात नाही. टोल नाक्‍यांवर रांगेत पुढे असलेल्या वाहनांना प्राधान्य देण्याच्या सक्त सूचना माझ्या चालकाला कायमस्वरूपी दिलेल्या आहेत.

ठाणे - घोटी येथील टोलनाक्‍यावर मंगळवारी (ता. 24) मध्यरात्री घडलेला प्रकार दुर्दैवी आहे; मात्र बेदम मारहाण झाल्याचे जे चित्र रंगवले जात आहे, ते वस्तुस्थितीला धरून नाही. अनेक वर्ष मी सार्वजनिक आयुष्यात असून माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडून कधीही अनुचित कृती घडलेली नाही. माझी गाडी कधी सिग्नल तोडत नाही. टोलनाक्‍यांवरही रांग सोडून जात नाही. टोल नाक्‍यांवर रांगेत पुढे असलेल्या वाहनांना प्राधान्य देण्याच्या सक्त सूचना माझ्या चालकाला कायमस्वरूपी दिलेल्या आहेत. त्यामुळे कधीही माझ्याकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग झाला आहे किंवा माझ्याशी संबंधित कोणी अरेरावी केली आहे, असे आरोप माझे विरोधकही करू शकणार नाहीत, असा खुलासा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक वाहतूक) यांनी बुधवारी केला.

ते म्हणाले की, घोटी येथील टोलनाक्‍यावर मध्यरात्री जो प्रकार घडला, त्यापूर्वीच माझी गाडी तिथून पुढे निघून गेली होती. पोलिसांची गाडी दुसऱ्या लेनमध्ये होती. वाहतूक कोंडी झाल्यामुळे पुढच्या गाड्या सोडा, असे वारंवार सांगूनही गाड्या सोडल्या जात नव्हत्या. त्यामुळे त्या गाडीतील एका सुरक्षारक्षकाने टोलचालकाचे लक्ष वेधण्यासाठी टोल केंद्रावरील काचेवर थाप मारली असता दुर्दैवाने ती फुटली. त्या काचेचा तुकडा उडून तेथील कर्मचाऱ्याच्या नाकाला इजा झाली. त्यात कोणालाही जाणूनबुजून इजा करण्याचा हेतू नव्हता. टोल कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही; तसेच त्याला दुखापत पोचवण्याचाही कुठला हेतू यात नव्हता, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाली, असे म्हणणे योग्य होणार नाही.

हा प्रकार मला उशिरा, ठाण्यात आल्यावर समजला. मी संबंधित सुरक्षा रक्षकाला समज दिली आहे. या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजही मी पाहिले आहे. यामध्ये कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल. कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगून या प्रकारामुळे संबंधितांना जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Web Title: No beat on ghoti toll naka