ठाकरे सरकारचा वीजबिलबाबत झटका; ग्राहकांना सवलत नाहीच

तुषार सोनवणे
Sunday, 15 November 2020

राज्य सरकारकडून वीजग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु सरकारने ग्राहकांना झटका दिला आहे. महावितरणाने एक परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई -  कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिल देण्यात आले असल्याची तक्रार राज्यातील ग्राहकांनी केली आहे. राज्य सरकारकडून वीजग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु सरकारने ग्राहकांना झटका दिला आहे. महावितरणाने एक परिपत्रक जारी केले आहे.

हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला

राज्यात लॉकडाऊनच्या काळात महावितरणाच्या ग्राहकांना वीजबिल नेहमीपेतक्षा अधिक आले होते. त्यामुळे अनेक संघटना आणि नागरिकांनी वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलने केली होती. अनेक सेलिब्रेटींनी देखील याबाबत समाजमाध्यमांवरून आवाज उठवला होता. काही संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही याबाबत आपले गऱ्हाणे मांडले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून वीजबिल ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. राज्य सरकारडून वाढीव विजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. परंतु या शक्यता आता मावळल्या आहेत. कारण त्यासंबधी परिपत्रक महावितरणाने जारी केले आहे.

महावितरणाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 

1 . वीजबिल ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा.

2. वाढीव वीज बिलाबाबत सवलत मिळणार नाही.

3. वीजबिल वसूल करण्याचे महावितरणचे आदेश

4. वाढीव वीजबिलबाबत ग्राहकांना माहीती देण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश

महावितरणाने जारी केलेल्या पत्रकामुळे राज्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलात कोणतही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट ग्राहकांकडून सर्व बील वसूल करण्याचे आदेश महावितरणाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. ग्राहकांच्या वीजबिलाबाबतच्या शंकांचे तक्रारींचे निरसन करण्याच्या सूचना महावितरणाने दिल्या आहेत. संबधित बीलाची रक्कम टप्प्याटप्याने भरण्याबाबतची मुभा महावितरणाने दिली आहे.

हेही वाचा - '...अन्यथा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू'; रस्ते दुरवस्थेवरून शिवसेना खासदार आक्रमक

वाढीव वीजबिलांमध्ये सूट मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याबाबत उर्जामंत्री नितिन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील असे म्हटले होते. त्यानंतर आता महावितरणाच्या आलेल्या परिपत्राकाचे राज्यातील वीजग्राहकांमध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No concessions to citizens for electric bills in state by Thackeray governments