मुंबईतील कॉलेजचा अजब कारभार, परीक्षा नाही...पण परीक्षा शुल्काची मागणी

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

विद्यापीठाकडून परीक्षा शुल्काच्या रकमेचा उल्लेख नसतानाही काही महाविद्यालये परीक्षेचे शुल्क आकारण्यासाठी परिपत्रक वापरत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

मुंबई ः कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण संस्था जुलैनंतरच उघडणार आहेत. 31 जुलैपर्यंत शाळा-कॉलेजेस बंदच असतील. लॉकडाऊन जाहीर होताच शाळा- कॉलेजेस बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा- कॉलेजेसच्या परीक्षा टप्प्याटप्प्यानं रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. कोरोना व्हायरसमुळे यंदा कोणतीही अंतिम परीक्षा घेण्यात आली नाही. मात्र मुंबई विद्यापीठ परीक्षा शुल्क का आकारत आहे? असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडला आहे. कारण विद्यापीठानं परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम मुदतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. परिपत्रकात परीक्षा शुल्काच्या रकमेचा उल्लेख नाही.
परिपत्रकात परीक्षा शुल्काच्या रकमेचा उल्लेख नसतानाही काही महाविद्यालये परीक्षेचे शुल्क आकारण्यासाठी परिपत्रक वापरत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

रकमेचा उल्लेख नाही पण अंतिम मुदतीचा उल्लेख 

23 जूनच्या परिपत्रकात परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेचा तपशील देण्यात आला आहे. तसंच त्या परिपत्रकात कोणतीही रक्कम समाविष्ट नसली तरी अंतिम मुदतीच्या चार्टमध्ये रेग्युलर सबमिशन करण्याच्या वेगवेगळ्या तारखांचा उल्लेख आहे आणि एक नेहमीप्रमाणे उशीरा फी आणि दुसरं अधिक उशीरा फी सह याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

कायदा विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले, परीक्षा नसताना विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क का द्यावे? हे अन्यायकारक आहे. आधीच लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात येत्या शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठीही कोणताही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. यामध्ये, महाविद्यालये विशेषत: परीक्षा नसताना परीक्षा शुल्काची विचारणा करु शकत नाहीत. आमच्या संस्थेने या शैक्षणिक वर्षाची फी रचना कमी करण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिलं असल्याचंही पवार यांनी सांगितलं. 

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

महाविद्यालये परीक्षा शुल्क आकारत असल्याचं सांगत याबाबत विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्या. या तक्रारी आल्यानंतर एक प्रकारचा धक्का बसल्याचं विद्यार्थी संघटनांनी म्हटलं आहे. सध्या प्रत्येकजण आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास सांगू शकत नाही. जर राज्य सरकारनं परीक्षा होणार नसल्याचे जाहीर केलं असतानाही विद्यापीठाकडून परीक्षा शुल्क आकारण्याची ही योजना धक्कादायक असल्याचं छात्रभारती विद्यार्थ्यांच्या संघटनेचे रोहित ढले म्हणाले. रोहित यांनीही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अन्यायकारक निर्णय व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन संचालक विनोद पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण याबाबत त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no exams but mumbai university wants exam fees