मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरांना संपूर्ण करमाफी नाहीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पालिकेकडून नागरिकांना मालमत्ता कराची बिले

मुंबई: मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. यामुळे पालिकेला आता कुठल्याच प्रकारचा मालमत्ता कर भरावा लागणार नाही, असा समज लोकांचा झाला होता; मात्र पालिकेने सर्वसाधारण कर वगळून मालमत्ता कराची बिले लोकांना देण्यास सुरुवात केल्याने मालमत्ता कर लोकांना भरावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने पालिका निवडणुकीच्या तोंडावर 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी द्यायची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेनुसार मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर माफ करण्यात आला. अधिसूचनेनुसार संपूर्ण मालमत्ता कर माफ करायचा की सर्वसाधारण कर माफ करायचा, याबाबत संभ्रम होता; मात्र अधिसूचनेनुसार केवळ सर्वसाधारण कर माफ करायचा असल्याने लोकांचा केवळ 30 टक्केच कर माफ होणार आहे. यामुळे इतर 70 टक्के कराची देयके देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून आता पुन्हा एकदा पालिकेने देयके द्यायला सुरुवात केली आहे.

अधिसूचनेमुळे मालमत्ता करातील सर्वसाधारण कर जरी माफ झाला असला, तरी पाणी पट्टी कर, जलभार कर, मलनिस्सारण कर, पालिका शिक्षण उपकर, मलनिस्सारण लाभ कर, पालिका शिक्षण उपकर, रोजगार हमी कर, पथ कर, वृक्ष कर हे नऊ कर भरावे लागणार आहेत. पालिकेला पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या एकूण मालमत्ता 18 लाखांहून अधिक असून त्यातून पालिकेला 378 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत. अधिसूचनेतील संभ्रमामुळे पालिकेला सातशे कोटीहून अधिक रुपयांची वसुली करावी लागणार आहे.

संपूर्ण मालमत्ता कर माफ होणारच
शिवसेनेने मुंबईकरांना पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र पालिका प्रशासन मुंबईकरांना मालमत्ता कर देयके देत आहे का, याची माहिती घेऊन त्याबद्दल त्यांना विचारणा करू. शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईकरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ होणारच.

- यशवंत जाधव, सभापती, स्थायी समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NO FULL TAXATION FOR HOMES IN MUMBAI