महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी मुंबईत मेगाब्लॉक नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai railway route mega block

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या आंबेडकर अनुयायांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मध्य, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी मुंबईत मेगाब्लॉक नाही!

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून येणाऱ्या आंबेडकर अनुयायांची गैरसोय होऊ नयेत म्हणून रविवारी (ता.४) मध्य, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी दर रविवारी नियमितपणे मेगाब्लॉक घेण्यात येते. मात्र,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक नसणार आहे. दर वर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.

त्यामुळे आंबेडकर अनुयायांची गैरसोय होऊ नयेत आणि योग्य पद्धतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी रविवारी (ता.४) मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. तर पश्चिम रेल्वेवर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

१२ लोकल फेऱ्या -

मध्य रेल्वेकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा येणार आहे. याशिवाय १४ लांब पल्ल्यांच्या गाड्या चालवण्यात येणार असून आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा जोडण्यात आलेला आहे.