"नो पार्किंग'चा नियम धाब्यावर 

योगेश पिंगळे
सोमवार, 2 जुलै 2018

बेलापूर - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस आणि नवी मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानंतर सीबीडी बेलापूर, सीवूड्‌स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी आदी ठिकाणी "नो पार्किंग', "समांतर पार्किंग' आदी फलक लावले आहेत. वाहनचालकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या बेकायदा पार्किंगचा त्रास पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. 

नवी मुंबई शहर हे 21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. शहराची रचना नियोजनबद्ध झाली असली तरी वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. वाहनतळ नसल्याने जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. सीबीडी, सीवूड्‌स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी येथील सोसायट्यांसमोरचे अरुंद रस्ते, मार्केट, रेल्वेस्थानके, चौक, शाळा महाविद्यालयांबाहेरील रस्ते आदी ठिकाणच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ती सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी "नो पार्किंग', "समांतर पार्किंग', "सम-विषम पार्किंग' आदी सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु त्याला न जुमानता मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. विशेष म्हणजे नो पार्किंगचा फलक असलेल्या ठिकाणीही वाहने उभी केली जात आहेत. अशा पार्किंगवर कारवाई करून त्यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणणे अपेक्षित असताना कारवाई होत नसल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नेरूळ, सीवूड्‌समधील शाळांच्या बाहेरील रस्त्यांवरही बेकायदा पार्किंग होत असल्याने शाळा भरताना आणि सुटताना तेथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

बेकायदा पार्किंग होणाऱ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. वाहन पार्किंगच्या जागा आणि वाहनचालकांचे सहकार्य ही मूळ समस्या आहे. वाहनतळासाठी महापालिका आणि सिडकोने जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मल्टीलेव्हल पार्किंगसारख्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. 
- नितीन पवार, उपायुक्त (वाहतूक) 

Web Title: No parking rule issue